Ahmednagar News अहमदनगर : राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर टीका करत निवडणूक आयोग ही भाजपची विंग असल्याचे म्हटले होते, सोबतच शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख जखमी वाघ असा करत जखमी वाघ किती घातक असतो हे दाखवून देऊ असं म्हटलं होतं. यावरून भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जखमी वाघ वगैरे काही नाही, दात राहिलेले नाहीत, व्याकुळ झालेला आहे. जखमी वाघ काही करू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी कर्जत जामखेडमध्ये जो मेळावा घेतला त्यावरून जयंत पाटील यांच्यावर देखील त्यांनी टीकास्त्र सोडलं. त्यांनी मेळावा घेतला पक्षात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, पक्ष कोणता हेच त्यांना माहिती नाही. निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांना पत्र देखील दिलेले नाही. अध्यक्षांच्या आधी उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्या नियुक्ती केल्या. हे राज्यात पहिल्यांदाच घडलं असल्याचं राम शिंदेंनी म्हटलं आहे.
भावी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगुर झाल्याशिवाय राहणार नाही
राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर टीका करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केवळ गृहमंत्रीच नाही तर संपूर्ण सरकार अपयशी ठरले असल्याचे म्हटले. या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, दुसरा माजी मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणारा उपमुख्यमंत्री असे तीन लोक झाले आहेत. त्यांच्या त्यांच्यातच सत्ता संघर्ष सुरू आहे. त्यामुळे त्यांना जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना भाजप आमदार राम शिंदे यांनी संगमनेरात बाळासाहेब थोरात यांच्या नावे भावी मुख्यमंत्री असे फलक लागले होते, हे त्यांना विचारात घेतल्याशिवाय लागले नसावेत, असं म्हटलं आहे. मात्र त्यांचं भावी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगुर झाल्याशिवाय राहणार नाही असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक जवळ आल्याने विरोधकांकडून फडणवीसांवर टीका
राज्यात झालेल्या गोळीबार आणि इतर घटनांवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं, गृहमंत्री निष्क्रिय असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. यावर बोलताना राम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा घर कोंबडा असा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यावेळी कोविडचा काळ सुरू होता, त्या वेळेला लोकांच्या दुःखात ते सहभागी झाले नाहीत. निवडणूक जवळ आल्याने कुणाला तरी दोष द्यायचा म्हणून विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे
दोषींवर योग्य कारवाई होईल
घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाच्या एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता आहे. चौकशीत समोर येईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हणत, या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.यावर राम शिंदे यांनी म्हटले की, गृहमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. कुणाकडे काही माहिती असल्यास तपासाचा भाग म्हणून त्याची तपासणी होईल आणि दोषींवर योग्य कारवाई होईल असे म्हटले आहे.
पुण्यातील घटना म्हणजे ॲक्शनच्या विरोधात रिॲक्शन
आपल्या देशात संविधान आहे, त्यामुळे विरोधकांवर बोलताना संविधानिक बोलला पाहिजे. केवळ बोलता येते म्हणून दुसऱ्यावर कोणत्याही पद्धतीची टीका करणं हे सहन होऊ शकणार नाही, असं म्हणत निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटनांचं समर्थन होऊ शकत नाही, मात्र पुण्यातील घटना म्हणजे ॲक्शनच्या विरोधात रिॲक्शन आहे असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
लोकप्रतिनिधी केवळ एखाद्या समाजाचा नसतो
अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला (OBC Mahaelgar Melava) आमदार राम शिंदे हे अनुपस्थित होते. याबाबत विचारले असता संत वामन भाऊ यांच्या गहिनीनाथ गडावरील जयंती कार्यक्रमासाठी मी गेलो असल्याने या मेळाव्याला मला उपस्थित राहता आलं नाही माझ्या शुभेच्छा ओबीसी समाजासोबत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी केवळ एखाद्या समाजाचा नसतो असं त्यांनी म्हटले आहे.
पक्ष जो निर्णय घेईल, त्या पद्धतीने निवडणूक लढवण्यास तयार
अहमदनगर दक्षिण लोकसभा लढवण्याबाबत (Lok Sabha Election 2024) आमदार राम शिंदे यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली आहेत. मात्र, हा संपूर्ण निर्णय भाजपचा पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं. जो व्यक्ती इच्छा व्यक्त करतो त्याची चर्चा पार्लमेंटरी बोर्डमध्ये होते. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, त्या पद्धतीने आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Sanjay Raut: उद्धव ठाकरे हे जागतिक दर्जाचे फोटोग्राफर, फेकूचंद एकनाथ शिंदेंची ओळख काय? राऊतांचा सवाल