Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : नगर जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान कोणी केल असेल तर ते शरद पवारांनी (Sharad Pawar) केले आहे, असा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) केला आहे. जिल्ह्यात भांडणं लावायची ही शरद पवारांची अनेक वर्षांची परंपरा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
अहमदनगरला (Ahmednagar) महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विखेंना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील असंतृष्ट लोकांची मोट त्यांनी बांधायची आणि त्या लोकांना शिमगा करायला लावायचा असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.
जिल्ह्यातील जनता दूधखुळी नाही
पवारांचे जिल्ह्यात योगदान काय? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी उपस्थित केला आहे. तर आयात केलेला उमेदवार उभा करून तुम्हाला निवडणूक (Lok Sabha Election 2024) करायची आहे. मात्र जिल्ह्यातील जनता दूधखुळी नाहीये. तुमचे सर्व मनसुबे गेल्या वेळी धुळीस मिळाले होते. यावेळी देखील महायुतीचा उमेदवार जास्त मताने निवडून येईल तेच उत्तर पवारांच्या कर्तुत्वाला योग्य राहील, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात भांडणं लावण्याची शरद पवारांची अनेक वर्षांची परंपरा
नगर जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान कोणी केल असेल तर ते शरद पवारांनी, असा आरोप करत जिल्ह्यात भांडण लावायची ही शरद पवारांची अनेक वर्षांची परंपरा असून जिल्ह्यातील सर्व लक्ष आपल्याकडे न ठेवता जिल्हास्तरावर ठेवायचं, अशी टीका त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यावर कोणी आवाज उठवला हे आम्ही ऐकलं नाही. तर नगर जिल्ह्यासाठी शरद पवारांनी काय केलं याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, असं आव्हान त्यांनी दिलय. आठ महिन्यापूर्वी अजित पवारांसोबत गेलेला उमेदवार अजित पवारांना सोडू शकतो तर तो जनतेला सोडू शकतो, असं म्हणत या जिल्ह्याच्या सर्वात जास्त वाटोळ कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी असं विखे यांनी म्हटले आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांचा निलेश लंकेंवर निशाणा
सुपा एमआयडीसीच्या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर निशाणा साधला आहे. एमआयडीसी काही लोकांनी ठेकेदारीसाठी वापरली. तर हे सगळे ठेकेदार आहेत त्यांचा बंदोबस्त करावाच लागेल, असा इशाराच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे.
आणखी वाचा