अहमदनगर: मराठा आंदोलनाचा वणवा (Maratha Reservation Protest) राज्यभर पेटला असताना त्यावरून आता अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी घ्या, समाजात दुही निर्माण होऊ देऊ नका अशी मागणी हिवरे बाजारचे (Hiware Bazar) माजी सरपंच पोपटराव पवार यांनी केली आहे. पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र (Popatrao Pawar Letter To CM Eknath Shinde) लिहिलं आहे, त्यातून ही मागणी केली आहे. 


काय लिहिलंय पत्रात? 


गेली पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये विविध समाजातील आरक्षणाबाबत संघर्ष चालू आहे. समाजात निर्माण झालेला असमतोलपणा हाच या गोष्टीला कारणीभूत असल्याचे पत्रात म्हटले आहे. सध्या मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलेल आहे, ही एक समाजात असमतोलपणाचीच बाजू असून त्यातून समाजात मोठ्या प्रमाणामध्ये दुही निर्माण झालेली आहे. ज्यांना पूर्वीचे आरक्षण आहे त्यांना आपले आरक्षण कमी होईल की काय याची भीती निर्माण होत आहे. तर ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मिळण्याची वाट पाहत आहेत. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीने योग्य नाही अशा आशयाचे पत्र पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. 


सोबतच यावर वेळीच विचार करून तातडीने निर्णय व्हावा ज्यामुळे समाजात दुही निर्माण होणार नाही, त्यासाठी काही कटू निर्णय घेण्याची वेळ आली तरी चालेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. याचा सहानभूतीपूर्वक विचार व्हावा अशा आशयाचे पत्र पोपटराव पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.


मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन 


मी समाजाला सांगितले होते, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करतोय. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करतेय ही शंका येतेय. जाळपोळ करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणून बुजून त्यांचीत घरं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत अशी शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे. 


बीडसह राज्यभरात मराठा आंदोलकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. 


ही बातमी वाचा: