अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभरातील विविध घटकांसोबत इंदुरीकर महाराजांनीही (Indurikar Maharaj) पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस कोणताही कीर्तनाचा कार्यक्रम करणार नाही असं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. आता ते आंदोलनातही सक्रिय झाले असून संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट दिली. त्यामुळे आधी आंदोलनाला पाठिंबा आणि आज थेट आरक्षणासाठी मैदानात सक्रिय असं काहीसं चित्र इंदुरीकर महाराजांच्या बाबत दिसत आहे. 


कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी आज सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय उपस्थिती लावली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी इंदुरकरांनी भेट दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जोर्वे गावात आज कडकडीत बंद पाळत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. त्या आंदोलनाला इंदुरीकर महाराजांनी पाठिंबा दिला आहे. 


पुढचे पाच दिवस सर्व कार्यक्रम रद्द 


इंदुरीकर महाराजांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासाठी पुढच्या पाच दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांनी सोमवारपासून पाच दिवस एकही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. इंदुरीकर महाराजांचे रोजचे नियोजित कार्यक्रम ठरलेले असतात. पण जालन्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांनी त्याला पाठिंबा देत पाच दिवस कीर्तनाचे कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


मराठा आंदोलनाचा लढा सोशल मीडियावर


मराठा आरक्षण याच विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केले आहे. परिणामी राज्यातल्या प्रत्येक गावात, शहरात आंदोलनं सुरू आहेत, तेही तीव्रतेने. मात्र एकीकडे हे प्रत्यक्ष आंदोलन सुरू असताना सोशल माध्यमांचाही या आंदोलनासाठी मोठा उपयोग केला जात आहे. प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर मराठा आरक्षणाबाबत पोस्टचा अक्षरशः पाऊस पडतोय. प्रत्येक घटना मीडियामध्ये येण्याआधी सोशल मीडियावर येत आहे. 


आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातील मूलभूत गरजच सोशल माध्यमं झाली आहेत. वैयक्तिक असो की सामाजिक गोष्ट, प्रत्येक अपडेट फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर,  यूट्यूब, स्नॅपचॅट आदी प्लॅटफॉर्मवर केली जात आहे. याच माध्यमांचा मराठा आरक्षणाबाबत जोरदार उपयोग केला जात आहे. 


ही बातमी वाचा: