अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना त्यात आणखी एका मोठ्या नावाचा समावेश झाला आहे. इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासाठी पुढच्या पाच दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
इंदुरीकर महाराजांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारपासून पाच दिवस एकही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. इंदुरीकर महाराजांचे रोजचे नियोजित कार्यक्रम ठरलेले असतात. पण जालन्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांनी त्याला पाठिंबा देत पाच दिवस कीर्तनाचे कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आंदोलक भावनिक, जरांगेंना पाणी घ्यायला लावलं
मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. यावेळी आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे यांनी आज पाण्याचा एक घोट घेतला. आता पाणी पितोय पण पुन्हा पिणार नाही असा इशारा यावेळी जरांगे यांनी दिला. पाणी घेतलं पण वैद्यकीय तपासणीसाठी त्यांनी नकार दिला. आंदोलकांना भावनिक न होण्याचं आवाहन यावेळी मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना देखील त्यांनी पुन्हा एकदा माघारी धाडलं आणि उपचार घेण्यास नकार दिला.
अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्यांनी निदान पाणी तरी घ्यावं अशी विनंती आंदोलक करत होते. खूपच विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण यापुढे काहीच घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.
राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगेचं आवाहन
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना ते म्हणाले की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल. राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकारला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही.
ही बातमी वाचा: