अहमदनगर : 'लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा'. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाच्या निलेश लंकेंना (Nilesh Lanke) उद्देशून केलेल्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांमध्ये मोठा राजकीय अर्थ आणि राजकीय भविष्यही दडलंय. कोल्हेंच्या या वक्तव्याने अजित पवार गटाच्या  (Ajit Pawar) कानठळ्या बसल्या असतील, तर शरद पवार (Sharad Pawar) गटात उत्साह संचारला असेल. पण यामुळे महाराष्ट्र बुचकळ्यात मात्र पडला असेल. कारण शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी हे जाहीर वक्तव्य केलंय ते अजित पवार गटाचे  आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात. तेही थेट निलेश लंके यांच्या शेजारी उभं राहून.


खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना शरद पवार गटातून निवडणूक लढण्याची खुली ऑफर दिली. त्यावेळी निलेश लंके यांच्या चेहऱ्यावरील भाव मात्र त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे गर्भित अर्थ सांगताहेत. खरंतर महाराष्ट्राच्या आणि सर्वपक्षीयांच्या भुवया उंचावण्याची सुरूवात तेव्हाच झाली, जेव्हा निलेश लंकेंच्या कार्यक्रमाचे बॅनर झळकले तेव्हा. 


निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले होते. त्याच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले आणि ते पाहणाऱ्यांनी मात्र आश्चर्य व्यक्त केलं. कारण नेता अजित दादांचा आणि कार्यक्रमाचं निमंत्रण शरद पवारांच्या खासदाराला. त्यात गल्लोगल्ली लागलेले हे बॅनर. त्यामुळे निलेश लंके अजितदादांच्या मळ्यातून शरद पवारांच्या तळ्यात उडी मारणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.


रोहित पवारांच्या वक्तव्याने संभ्रम वाढला 


या प्रश्नचिन्हाभोवती संभ्रमाचा गुंता आणखीच वाढवला तो सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी. डॉ. अमोल कोल्हे यांचा नगरमध्ये कार्यक्रम सुरू आहे, ते अप्रत्यक्षपणे निलेश लंके यांना मदत करत आहेत. त्यामुळे लंके यांच्या उमेदवारीचा मुद्दा हा डॉ.अमोल कोल्हे यांनाच माहिती असेल. हळूहळू पुन्हा सर्व बॅनर वरती शरद पवारांचे फोटो दिसतील असं रोहित पवारांनी म्हटलं. 


ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्या संपर्कात असते. लोकशाहीमध्ये डायलॉग आसलाच पाहिजे या मताची मी आहे, चर्चा विकास कामासाठी होत असते असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


लंकेंचा जनसंपर्क तगडा


अहमदगर दक्षिण हा खरंतर चर्चेतला मतदारसंघ.निलेश लंके यांना सामाजिक कार्याची जोड आणि तळागाळापर्यंत त्यांचा तगडा जनसंपर्क. त्यांना लोकसभेसाठी अजित पवारांकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. मात्र त्यांचे कट्टर विरोधक सुजय विखेही भाजपकडून लोकसभेसाठी गळ टाकून बसलेत. 


राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील हे बापलेक मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन भाजपात आले. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी विद्यमान भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुन्हा एकदा सुजय विखे पाटलांना लोकसभेचं तिकिट मिळण्याची शक्यता आहे. 


निलेश लंकेंची लोकसभेसाठी बेगमी


निलेश लंके हे सुजय विखे पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. निलेश लंके हे अजित पवारांसोबत असल्याने सुजय विखे आणि लंके महायुतीत आहेत. महायुतीतून तिकिट मिळण्याची शक्यता कमी असल्याने निलेश लंकेंनीही शरद पवार गटातून तिकिटाची बेगमी केल्याची चर्चा आहे. 


अशा सगळ्या परिस्थितीत लेकाच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या राधाकृष्ण विखेंना मात्र बोलताना तारेवरची कसरत करत ठोस काही बोलता आलेलं नाही. लोकसभा लढवण्याचा विचार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण आपण निलेश लंकेंना समजावणार नाही, त्यांना अजितदादा बोलतील असं ते म्हणाले. 


तर अशी ही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची सध्याची गोष्ट, ज्याची वाट अनेक शक्यतांचे वळसे घेऊन जातेय. अनेक संघर्षाच्या ठिणग्या इथं आहेत आणि संभ्रमाच्या अनेक निसरड्या पोटवाटाही. त्यामुळे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेले निलेश लंके लोकसभा तिकिटाची वेळ साधणार की शरद पवार गटाची तुतारी फुंकून अजितदादांच्या कानठळ्या बसवणार याच्याच चर्चा सध्या रंगल्या आहेत.


ही बातमी वाचा: