अहमदनगर: राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच अहमदनगरच्या राजकारणात अत्यंत रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे नाव अहमदनगर दक्षिणमधील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. पारनेरचे आमदार असणारे निलेश लंके हे सध्या अजित पवार गटात आहेत. परंतु, ते कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी जोरदार हवा आहे. अशातच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निलेश लंके यांना जाहीरपणे आपल्यासोबत येण्याची साद घातली आहे. लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट ऑफर देऊन टाकली. यावर आता निलेश लंके काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निलेश लंके यांच्या बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो दिसला होता. तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य आयोजित करण्यात आले होते. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सध्या सुरु असलेले वाकयुद्ध पाहता निलेश लंकेंनी आपल्या मतदारसंघात त्यांचे नाटक ठेवल्याने अगोदरच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हाच निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार, या चर्चेने पुन्हा जोर धरला होता. परंतु, हे महानाट्य संपल्यानंतर अमोल कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना निलेश लंके यांना जाहीर साद घालून या चर्चेला आणखीनच हवा दिली. 


अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?


अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लंके यांची प्रशंसा करताना अमोल कोल्हे यांनी म्हटले की, 'लोकनेते माझे जवळचे मित्र आहेत. ज्यांच्या सामाजिक कार्याचा मला नेहमी अभिमान वाटतो. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील माणसं जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवतात त्यावेळी अभिमान वाटतो. महानाट्याला उदंड प्रतिसाद देणाऱ्या नगरकरांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच लाखांच्या गर्दीचे चोख नियोजन करणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मी मानाचा मुजरा करतो, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. 


यानंतर अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना शरद पवार गटात येण्याची ऑफर दिली.  लोकनेत्यांना वाढदिवसाला गिफ्ट द्यायचं असतं, पण मी मागतोय, लोकनेते यांनी लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही. दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून जर संसदेत आला तर सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीत घुमेल. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिण नगर मध्ये वाजली पाहिजे. लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.


आणखी वाचा


आधी बॅनरवर शरद पवारांचा फोटो, आता कोल्हेंच्या 'महानाट्या'चं आयोजन; लोकसभेच्या उमेदवारीसाठी निलेश लंके हाती 'तुतारी' घेणार?