अहमदनगर : राज्यातील सत्तांतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या आदेशावरुनच झालं असल्याच्या मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर 'हेराफेरी' चित्रपटाची आठवण येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. या सर्व हेराफेरीत राज्यातील जनता मात्र भरडली गेली असल्याचं ते म्हणाले.
राज्यातील सत्ता परिवर्तनासाठी आमच्या 150 बैठका झाल्या या तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "तानाजी सावंत यांची कॅपॅसिटी किती आहे हे खरंतर सोलापूरकरांना विचारलं पाहिजे. ज्यावेळेला सत्तासंघर्ष सुरू होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, मला याबाबत काहीच माहिती नाही. सत्तासंघर्ष संपल्यानंतर एका अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हेच खरे यामागचे कलाकार आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता तानाजी सावंत म्हणतात की त्यांनी 120 ते 150 बैठका घेतल्या. त्यांनी या बैठका नेमक्या कोणासोबत घेतल्या हे बघावं लागेल. या सर्व घडामोडींकडे पाहिलं की हेराफेरी या चित्रपटाची आठवण होते, मात्र या सगळ्या हेराफेरीत सर्वसामान्य जनता भरडली गेली."
भाजप-शिवसेनेकडून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे, याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली ते म्हणाले की, "या सरकारच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावेळी भाजप शांत होता. त्यावेळेला तुम्ही गौरव यात्रा का काढली नाही? जनतेला हे सर्व कळतं आणि जनताच काय निर्णय घ्यायचा तो घेईल."
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात बोलताना बाहेरचे पार्सल हे बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे असं म्हणत रोहित पवारांवर टीका केली होती. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "काही लोक फक्त टीकाच करतात. त्यांच्या टीकेला किती महत्त्व दिलं पाहिजे हे फार महत्त्वाच आहे. ते जरी मला पार्सल म्हणत असले तरी मी या आधीच सांगितलं आहे की कर्जत जामखेडला महाविकास आघाडीने विकासाचे पार्सल दिलं आहे. त्यातील काही हिस्सा हा या सरकारने स्थगितीत अडकवला आहे. त्यामुळे त्यांनी कामांवरील स्थगिती उठवून कर्जत जामखेडला विकासाचं पार्सल गिफ्ट करायला पाहिजे. कर्जतमध्ये मी स्वतःचं घर हे बांधत आहे आणि या घराच्या वास्तूशांतीची पत्रिका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना लवकरच पाठवणार आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला यावं."
ही बातमी वाचा :