Pune To Ahmadnagar Train: नगर-आष्टी रेल्वे सुरू झाल्यानंतर या रेल्वे गाडीला प्रवाशांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही रेल्वे गाडी अहमदनगर ते पुणे (Pune To Ahmadnagar Train) सुरू करावी अशी मागणी मागील काही दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात आहे. त्या मागणीसंदर्भात सकारात्मक विचार करु आणि केंद्रीय रेल्वे समितीची बैठक होणार आहे त्यात हा विषय मांडू असे आश्वासन रेल्वे बोर्डाच्या अखिल भारतीय रेल्वे प्रवाशी सेवा सुविधा समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी दिला आहे. आज त्यांनी अहमदनगर रेल्वे स्थानकाची पाहणी केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
रेल्वे बोर्डाच्या रेल्वे प्रवाशी सेवा सुविधा समितीने आज अहमदनगर रेल्वे स्थानकाची पाहणी केली. तसेच प्रवाशांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समितीमध्ये राज्यसभेचे खासदार के रवीचंद्रन, डॉ राजेंद्र फडके, कैलास वर्मा, गिरीश राजघोर यांचा समावेश आहे. या समितीने सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांची पाहणी सुरू केली असून अहमदनगर येथे रेल्वे स्थानकावरील कॅन्टीनची व्यवस्था, प्रवाशांची बसण्यासाठीची व्यवस्था, पाण्याची सुविधा यांची पाहणी करत नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले की पुणे-अहमदनगर या रेल्वे गाडीची मागणी प्रवाशांकडून केली गेली आहे. तसेच लखनऊ, दरभंगा या भागात जाणाऱ्या, पुण्यावरून सुटणाऱ्या गाड्यांना अहमदनगरमध्ये थांबा द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. याबाबत 10 एप्रिलला केंद्रीय रेल्वे समितीची बैठक होणार असून या बैठकीत हे विषय मांडले जातील त्याला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा डॉ.फडके यांनी व्यक्त केली.
केंद्रीय समिती अहमदनगर रेल्वे स्थानकावर पाहणीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्यावतीने सकाळ पासूनच रेल्वे स्थानकावर साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. ज्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहेत, वीजेवर चालणारे फलक बंद आहेत ते सुरू करण्यात आले. दरम्यान नगर येथील प्रवाशांच्या सर्वच मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असं कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.
अहमदनगर-पुणे रेल्वे सुरु करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत आहे. मात्र त्यासंदर्भात अजूनही कोणती घोषणा किंवा माहिती जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात अजून कोणताही प्रस्ताव आला नाही आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात या मार्गाला मंजूरी मिळते का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.