Nilesh Lanke: आमदार निलेश लंकेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, पाठिंब्यासाठी अनेक ठिकाणी रास्ता रोको, अधिकाऱ्यांची खुर्चीही जाळली
आमदार निलेश लंके (Nilesh Lanke News) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.
MLA Nilest Lanke Protest: राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke News) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke Protest Live) यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी पाटील, सुपा, या ठिकाणी रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आलंय
आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तीन दिवस उलटूनही प्रशासनाने निलेश लंके यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असं मत आमदार निलेश लंके यांच्या मातोश्रींनी म्हटले आहे. या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले आहेत त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे असं शकुंतला लंके यांनी म्हटले आहे. तर आई वडिलांना लेकरांची काळजी असते त्यामुळे माझी आई इकडे आली असल्याचे आमदार लंके म्हणाले. तसेच आज पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव टायर जाळल्याबाबत बोलताना आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे असं लंके म्हणाले. तर पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या उपअभियंत्यांची अधिकाऱ्यांची खुर्ची देखील अज्ञात नागरिकांनी जाळली.
काल पाथर्डी ,शेवगाव, पारनेर या ठिकाणी अनेक गावे बंद ठेवण्यात आली होती. तर आज रस्ता रोको करून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत तीन वेळा बैठका करून देखील आमदार निलेश लंके यांचा समाधान न झाल्याने त्या आंदोलन तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे आणि त्याला अहमदनगरच्या दक्षिण भागातून चांगलाच पाठिंबा मिळताना दिसतोय.
त्यातच भाजपकडून निलेश लंके यांचं आंदोलन म्हणजे एक स्टंट असल्याचं म्हटलं आहे, त्याला आमदार निलेश लंके यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मी जिल्ह्यात कारने फिरतो हेलिकॉप्टरने नाही असं म्हणत त्यांनी विखे पिता पुत्रांवर निशाणा साधला. भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी म्हटलं आहे की, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात कठोर भूमिका घेतल्याने आमदार लंके यांचे कार्यकर्ते अडचणीत आल्यानेच आमदार लंके उपोषणाला बसलेत की काय? अशी शंका येत आहे. ज्यावेळी मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री मंत्रालयात येत नव्हते तेव्हा आपण आंदोलन का केली नाही असं मुंढे म्हणाले.