Ahmednagar News अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात कुणबी नोंदणी शोधण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात शोध मोहिमेने जोर पकडलाय. अहमदनगर जिल्ह्यात देखील प्रशासन युद्ध पातळीवर कुणबी नोंदी शोधत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीनंतर राज्य सरकारने त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यापुरती मर्यादीत असलेली कुणबी नोंदणी शोधण्याची मोहीम आता संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 56 हजार 688 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.  या शोध मोहिमेत सुंदर मोडी या सॉफ्टवेअरची चांगली मदत होत असल्याचे समोर आलेय.


राज्यभरात मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या स्वरूपाच्या नोंदी शोधण्याचे आदेश दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्थरापर्यंत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.   त्याठिकाणी कुणबीच्या नोंदीची शोधमोहीम राबवली जात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात देखील जिल्हा प्रशासन विविध विभागांच्या मदतीने कुणबी नोंदी शोधत आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेने वेग पकडल्याचे बघायला मिळत आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 56 हजार 688 प्रमाणपत्र नोंदणी सापडल्याची माहिती जिल्हया प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


शिक्षण विभागाला मिळाल्या 4 हजार 11 नोंदी 


अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून कुणबी नोंदी शोधण्यासाठी विविध विभागांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसात प्राथमिक शाळांमधील तब्बल  11 लाख 14 हजार 958 शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या. यात 4 हजार 11 जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. पुढील काही दिवसात अधिक तपासणी  केली जाणार आहे. त्यामध्ये अजून कुणबी नोंदी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


52 हजार 677 जात वैधता प्रमाणपत्र 


अहमदनगर जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र विभागाने आतापर्यंत तब्बल 52 हजार 677 जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या कुणबी नोंदी शोधण्याच्या विशेष मोहिमेत महसूल विभाग, पोलिस प्रशासन, निबंधक कार्यालयातील दस्त, वस्तु संग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंद आदींची तपासणी केली जात आहे. यामध्यमातून अधिक मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यासारख्या नोंदी शोधल्या जात आहेत. 


सुंदर मोडी सॉफ्टवेअरची मदत 


बहुतांश दस्तावेजामध्ये कुणबी नोंदी या मोडी लिपीत आहेत. त्या नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपीचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींची गरज असते. मोडी लिपीचा अभ्यास असणाऱ्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे शोध मोहिमेत टेक्नॉलॉजीची मदत घेतली जातीये. जून दस्त मोडी भाषेत असल्याने 'मोडी किरण' हे पुस्तक आणि 'सुंदर मोडी' या सॉफ्टवेअरच्या मदतीने नोंदी शोधण्यात येत आहे, अशी माहिती मराठावाड्यातील लातूर येथील शिंदे समितीचे सदस्य असलेले मोडी अभ्यासक डॉ.संतोष यादव यांनी दिली.