छत्रपती संभाजीनगर : शहरात आयोजित करण्यात आलेल्या बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात बुधवारी अहमदनगर येथील एका मुस्लीम कुटुंबाने (Muslim Family) हिंदू धर्मात प्रवेश (Conversion) केला. आधी जमीर शेख असलेले आणि आत्ताचे शिवराम यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. या धर्मांतराच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र, जमीरचं शिवराम कसं झालं, 'त्या' धर्मांतराची नेमकी कहाणी काय? याबाबत खुद्द धर्मांतर करणाऱ्या कुटुंबाने 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत माहिती दिली आहे. 


धर्मपरिवर्तन करण्याची इच्छा कशी झाली? 


धर्मांतराची नेमकी कहाणी काय यावर बोलतांना शिवराम आर्य म्हणाले की, "आमचे आजी-आजोबा जालना येथील शेवता गावात राहत होते. पूर्वीपासून आमच्या घरात देवीचं ठाणं आहे. मात्र, 1972 मध्ये दुष्काळ पडला आणि आमचे आजी-आजोबा पोट भरण्यासाठी अहमदनगरमध्ये आले. त्यानंतर कधीही ते जालन्यात गेले नाही. पूर्वीपासूनच आम्ही हिंदू धर्माला मानतो. माझे आजी-आजोबा आणि आई-वडिलांनी देखील आपण सनातनी असल्याचं मला शिकवले आहे. आपण नेहमी पूजा पाठ करायचे, देवाचं स्मरण करायचं, कुणी काहीही म्हटलं तरीही ऐकायचं नाही असं त्यांनी मला शिकवलं आहे. हेच तुला काम येणार असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून धर्म परिवर्तन करण्याची आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही आता घरवापसी करून घेतली, असल्याचं शिवराम म्हणाले.


धर्मांतरावेळी शिवराम नाव का निवडलं?


धर्मांतर करताना तुमचं नाव काय ठेवायचं असं मला विचारण्यात आलं. त्या दोन-तीन मिनिटात मी माझं नाव शिवराम ठेवण्याचं ठरवलं. त्याचं कारण म्हणजे मला बोलवताना लोकांनी शिवराम म्हटलं पाहिजे. यामुळे त्यांच्या तोंडात रामाचं स्मरण होईल. जे लोक प्रभूच नाव घेत नाही, त्यांच्या तोंडात देखील मला आवाज देतांना शिवराम असे निघेल. तसेच लहान मुलाचं नाव कृष्णा आणि मोठ्याचं बळराम ठेवलं आहे. घरात मुलांना देवांचे नाव द्यायला पाहिजे. त्यामुळे नकारात्मकता दूर होते, असे शिवराम म्हणाले. 


नातेवाईकांशी लांबच राहतो...


माझे जे काही नातेवाईक होते त्यांच्यापासून मी खूपच लांब आहे. त्याचं कारण म्हणजे, त्या लोकांनी कधीही माझ्या दुःखात माझी मदत केली नाही. त्यामुळे या नातेवाईकांशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. मी आणि माझं कुटुंब कृष्ण भक्त आहे. आम्ही श्रीराम आणि सीताची पूजा करतो. दरवर्षी आम्ही गणपती बसवतो. त्यामुळे यात आम्ही आनंदी आहे. कोण काय करतो आणि काय बोलत याबाबत आम्हाला काहीही देणंघेणं नाही. माझं घर परमेश्वर चालवतो लोकं चालवत नाही, असेही शिवराम म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


घरवापसी! बागेश्वर धामच्या दरबारात जमीर शेख कुटुंबीयांनी स्वीकारला हिंदू धर्म