अहमदनगर : निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला कायदेशीर लढा सुरू होता. त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यावर दबाव करण्यात येत होता. तसेच सोबतच आमच्यावर हल्ला होणार असल्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं, त्याचबरोबर अनेक शिष्टमंडळांनी आमची भेट घेत लढा थांबविण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप अंनिसच्या रंजना गवांदे (Ranjna Gavande) यांनी केला.
आज अहमदनगर (Ahmednagar) शहरात अंनिसच्या (Andhashradhha Nirmulan) माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली. नुकताच इंदुरीकर महाराज यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा निर्णय दिला. त्यानंतर आज अंनिसच्या वतीने पत्रकार परिषद घेत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. जिल्हा न्यायालयामध्ये इंदुरीकरांच्या (Nivrutti Maharaj Deshmukh) बाजूने निकाल लागल्यानंतर दोन मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. सोबतच आमच्यावर हल्ला होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं, तात्काळ पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिलं असल्याचे रंजना गवांदे यांनी सांगितलं. तर इंदुरीकर महाराजांविरोधात कायदेशीर लढा उभारल्यानंतर त्यांच्या वतीने अनेक शिष्टमंडळांनी आमची भेट घेऊन हा लढा थांबवण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला असल्याचाही दावा गवांदे यांनी केला.
कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्यावर संगमनेर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात सुरू असलेला खटला सुरू ठेवावा, असा आदेश जून महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Highcourt) दिला होता. इंदुरीकर महाराज यांची याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयांने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कॉ. बाबा आरगडे आणि वकील रंजना गवांदे यांनी दिली आहे.
इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य बेकायदेशीर
अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. सम विषम तारखेला स्त्री संग झाला तर मुलगा कधी होतो आणि मुलगी कधी होते याबाबत इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य हे बेकायदेशीर असल्याचं म्हणत इंदुरीकर महाराजांविरोधात गर्भलिंग निदान कायद्यानुसार खटला सुरू झाला होता. मात्र हा खटला खालच्या न्यायालयात रद्द करावा, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र हा खटला सुरू ठेवावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी दिली आहे. सोबतच हा लढा आपण लढत राहू आणि त्यासाठी लागणारा पाठपुरावा सुरूच ठेऊ असं गवांदे म्हणाल्या.
इंदुरीकर आणि भिडे एकच प्रवृत्ती
कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याप्रमाणेच संभाजी भिडे यांनी देखील लिंगनिदानाबाबत बेकायदेशीर वक्तव्य केलं होतं. त्याविरोधातही अंनिसकडून तक्रार केली जाणार होती. मात्र दुसऱ्या एका व्यक्तीने याबाबत तक्रार केली असल्याने आम्ही तक्रार केली नाही, मात्र संबंधित तक्रारदाराला आमचा पाठींबा असून त्यांना आवश्यकता असल्यास पाहिजे ते सहकार्य करणार असल्याचेही गवांदे यांनी स्पष्ट केले. इंदुरीकर आणि भिडे यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे एक प्रवृत्ती आहे आणि आमचा लढा हा व्यक्तीविरोधात नसून तो प्रवृत्तीविरोधात आहे असंही गवांदे म्हणाल्या.
इतर संबंधित बातमी :
मोठी बातमी! इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका; याचिका फेटाळली, काय आहे प्रकरण?