अहमदनगर : अजितदादांनी सभेत राज्यपालांचे कान टोचले असते म्हणूनच भाजपकडून जाणीवपूर्वक त्यांना बोलण्याची संधी दिली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. देहू इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यात आता रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. 


रोहित पवार यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. चांगल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीने मिठाचा खडा टाकल्याची टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्यावर रोहित पवार म्हणाले की, "भाजपनेच धार्मिक कार्यक्रमात मिठाचा खडा टाकला आहे." 


अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान : सुप्रिया सुळे
देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू नदेणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा मंगळवारी (14 जून) पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 


खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही."


पंतप्रधानांनी हाताने इशारा केला, पण...
देहूतील शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे स्टेजवर उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.


आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण करु नये : रोहित पवार
रोहित पवार यांनी नुकतंच अयोध्या आणि वाराणसी इथे अध्यात्मिक पर्यटन केलं होतं. वाराणसी इथून आणलेलं गंगाजल आपल्या मतदारसंघासह राज्यातील 200 धार्मिक स्थळांमध्ये जलाभिषेक करण्याचा कार्यक्रम राबवत आहेत. हा कार्यक्रम म्हणजे राजकीय प्रोपगंडा नसून आपला भावनिक विषय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचंही रोहित पवार यांनी स्वागत केलं असून यावरुन कुणीही राजकारण न करण्याचं आवाहन केलं.