अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सामना रंगणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ (Sangamner Assembly Constituency) राज्यभरात चर्चेत आला होता. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. मात्र ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली. शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे सुजय विखे पाटील यांचा निवडणुकीतून पत्ता कट झाला आहे. आता याबाबत सुजय विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


सुजय विखे म्हणाले की, ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. नगर जिल्ह्यात कोणती जागा कोणाला जाईल, असे अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्रात 8 ते 10 जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या. या जागांबाबत वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली. 


प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार दिला : सुजय विखे 


शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचं वैशिष्ट्य असे आहे की, मागच्या पाच वर्षात त्यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक कामे केली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार आम्ही तिथे दिला आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा काय करून दाखवू शकतो हे 23 तारखेला कळेल, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. 


सुजय विखेंच्या सभेनंतर तापलं होतं संगमनेरचं वातावरण


दरम्यान, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सुजय विखे व्यासपीठावर असलेले वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानेही याबाबत दखल घेतली. राजकीय वर्तुळातही विरोधकांकडून याचा कडाडून विरोध करण्यात आला. यानंतर सुजय विखे यांचा पत्ता कट करत शिवसेना शिंदे गटाला संगमनेरची जागा सुटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


आणखी वाचा 


Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका