अहमदनगर: एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी रात्रीचा दिवस करतोय. मोठ्या सभा, भाषणं, प्रचार फेऱ्या सुरू आहेत तर दुसरीकडे पाण्याची टंचाई आणि दुष्काळाच्या झळा यामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय. अशीच काहीशी परिस्थिती दक्षिण नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दुष्काळाच्या तीव्र झळा दक्षिण नगर जिल्ह्यात जाणवू लागल्यात. दक्षिण नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटांत सापडलाय.
पाण्याअभावी आणि उन्हाच्या तडाख्यात करपत चाललेलं हे पिके बघितल्यावर दक्षिण नगर जिल्ह्यातील उन्हाळ्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. पावसाळ्यातील कमी पर्जन्यमान आणि कडक उन्हामुळे उभं पिकं करपून जातानाचे विदारक चित्र पाहण्याची वेळ नगर तालुक्यातील डोंगरगण इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे. वातावरणातील बदलामुळे फवारणी मोठ्या प्रमाणात करावी लागत आहे. तसेच झाड मोठे झाल्यावर त्याला बांधणीसाठी लोखंडी तार, बांबू आणि मजुरीखर्च तो वेगळाच... मात्र एवढ सगळे करुन पाण्याचं दुर्भीक्ष आणि उन्हाळा यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतमालाला हमीभाव नसल्याने कवडीमोल भावात माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतमालाला सरकारने हमीभाव द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. मात्र सरकार आणि लोकप्रतिनिधी हे सध्या निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहेत.दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही.
हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण
दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. नगर तालुक्यात अत्यल्प पावसामुळे बहुतांशी तलाव, बंधारे, विहिरी, कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. नगर तालुक्यातील मांजरसुंबा, डोंगरगण, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, गुंडेगाव, राळेगण, कवडगाव, दशमी गव्हाण, सांडवे, मदडगाव या गावात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. हंडाभर पाण्यासाठी अनवाणी पावलांनी दाहीदिशा वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. मात्र, याकडे लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासनानेही दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.
दुष्काळी स्थिती गंभीर
तर राज्यातील पाणी टंचाईबाबत सर्व अधिकार आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यापूर्वीच आपण टंचाई आराखडा तयार केला असून राज्यातील 23 जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चारा उत्पादनाचे काम हाती घेतल्याचे मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितले. एकीकडे शासन प्रशासन निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहे मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती गंभीर बनत चालले आहे याचा या आधीच पूर्वनियोजित आराखडा तयार करणे अपेक्षित होतं.
बळीराजाच्या वेदनावर फुंकर घालायला राजकारण्यांना वेळ नाही
एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचून मतांचा जोगवा मागण्यात व्यस्त आहे.मात्र दुसरीकडे पाण्याची टंचाई आणि उन्हाच्या तडाख्यात करपलेल्या पिकांकडे पाहत असलेल्या बळीराजाच्या वेदनावर फुंकर घालायला या राजकीय नेत्यांना वेळ नाही. मतांचा जोगवा मागायला बळीराजापर्यंत येताय तर निदान प्रेमाचे दोन बोलून धीर द्यायला तरी बळीराजापर्यंत या नेत्यांनी यावं एवढीच काय ती अपेक्षा आहे.
हे ही वाचा :
पाणी टंचाईवर मात करुया! जिल्ह्यात सोमवारपासून 'जलसमृद्ध नाशिक' अभियान, नेमकी काय आहे संकल्पना?