Ahmednagar News : काही दिवसांपूर्वी जागतिक योगा दिवस (World Yoga Day) साजरा झाला आणि अवघ्या जगभरात योगाचे महत्त्व विविध माध्यमातून सांगण्यात आले. याच योगाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर संगमनेर (Sangamner) तालुक्यातील योग शिक्षक असलेल्या युवकाने चीनच्या (China) युवतीशी लग्नगाठ बांधली आहे आणि चीनची मुलगी ग्रामीण भागाची सून झाली आहे. योगाच्या माध्यमातून जमून आलेल्या या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
आधी चिनी परंपरेने मग भारतीय पद्धतीने विवाह
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील 29 वर्षीय राहुल हांडे याने 31 वर्षीय शान छांग या चिनी तरुणीची चिनी परंपरेने लग्न करुन तिला भारतात आणून भारतीय पद्धतीने सोमवारी (03 जुलै) घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात लग्न केलं. भारतीय संस्कृतीप्रमाणे या दोघांनी सात जन्माचे फेरे देखील घेतले. राहुल हांडे चीन इथे योग शिक्षण केंद्र चालवतो. योगाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला दोन्ही कुटुंबांकडून होकार मिळाल्याने ते आधी चिनी संस्कृतीने चीनमध्ये विवाहबद्ध झाले आणि आता भारतात येत भारतीय संस्कृतीनुसार विवाहबद्ध झाले आहेत.
चीनची कन्या संगमनेरची सून
चीनची कन्या संगमनेर तालुक्याची सून झाल्याने या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती बघून शान छांग भारावून गेली असून राहुल सुद्धा तिला सर्वांशी ओळख करुन देत सर्व रुढी परंपरा समजावून सांगत आहे. विवाहसोहळ्यात बोलताना नवरीने चक्क 'कसे आहात' हे मराठीत म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती
हळदी, मिरवणूक व मंगलाष्टके अशा पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. जात, धर्म, वंश, भाषा या सीमा प्रेमाला नसतात. त्यामुळेच चीनच्या तरुणीसोबत तालुक्यातील तरुणाचे सूत जुळून ते सोमवारी विवाहबंधनात अडकले. घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात भारतीय संस्कृतीप्रमाणे पार पडलेला विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मंगलाष्टकांऐवजी शिवरायांची आरती आणि स्फूर्ती गीते लावून पार पडला विवाह
अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करुन त्यांची स्फूर्ती गीते लावण्यात आली. तसेच लग्नाला आलेल्या पाहुण्यांचा सत्कार न करता त्या खर्चाची बचत करुन तो पैसा शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना दान करण्यात आला. अहमदनगर शहरातील गोरक्षनाथ थोरात यांनी आपल्या मुलीचा विवाह वेगळ्या पद्धतीने करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडिया चांगलीच जोरदार चर्चा सुरु असून लग्नाच्या वेगळा पायंडा थोरात आणि धीसले परिवाराने पाडला आहे. योगिनी आणि विकास यांच्या विवाह सोहळ्यात ही अनोखी परंपरा सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा