Deepak Kesarkar on Maharashtra NCP Politics : "मंत्रिमंडळ विस्तार का लांबला हे सगळ्यांना समजलं," असं वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं. दीपक केसरकर यांनी आज (03 जून) साईबाबांच्या दरबारी हजेरी लावत गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई समाधीचे दर्शन (Shirdi Sai Baba) घेतले. संध्याकाळच्या आरतीला हजेरी लावल्यानंतर गुरुस्थानाजवळील लिंबाच्या झाडाचे पान आवर्जून घेत स्वतःच्या पाकिटत ठेवले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार शपथविधी ते मंत्रिमंडळ विस्तार या सर्व विषयांवर भाष्य केले.


शिंदे गटाला डावललं जाणार?


राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्याने शिंदे गटाला डावललं जाणार नाही. आमचे जे लोक मंत्री होणार आहेत त्यांना शपथ दिली जाईल. काही लोक सरकारमध्ये सामील होऊ इच्छित होते. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचे कारण आता सर्वांना लक्षात आले असेल. शिंदे-फडणवीस यांच्या कामाची गती दादा आल्याने आणखी वाढेल, असं केसरकर म्हणाले. अजून अठरा मंत्री व्हायचे आहेत. त्यामुळे आमच्या लोकांवर अन्याय होईल असे म्हणण्याचे कारण नाही. लवकरच त्यांचाही शपथविधी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


अजित पवारांवर आम्ही टीका केली नाही


अजित दादांवर आमच्यापैकी कुणीच टीका केली नाही. दादा आज ना उद्या आमच्यात येणार याची आम्हाला खात्री होती. जी टीका झाली ती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली. देवेंद्र फडणवीसांनी विश्वास ठेवला मात्र शरद पवारांनी त्यांची निराशा केली, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.


ईडीकडून हसन मुश्रीफ यांची फक्त चौकशी


हसन मुश्रीफ राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. त्यांची जी उत्तरं असतील त्यांनी ती ईडीला द्यावीत. ईडीने फक्त त्यांची चौकशी केली आहे, कारवाई केलेली नाही. चौकशी म्हणजे कारवाई नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.


नेतृत्वाच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीतील संघर्ष 


एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवारांनीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, याबाबत विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले की, "मविआ सरकारमध्ये आम्हाला निधी मिळत नव्हता. मात्र आमचे मुख्यमंत्री गप्प असल्याने त्यांची साथ सोडली. आमचा लढा बाळासाहेबांच्या विचारांसाठी होता. राष्ट्रवादीतील संघर्ष हा नेतृत्वाच्या प्रश्नावरुन झाला आहे. अजितदादांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता. त्यांना बाजूला टाकून दुसरं नेतृत्त्व पुढे यायला लागलं. दादांवर अन्याय व्हायला लागल्याने त्यांनी हा लढा दिला."


'काँग्रेसकडे विरोधीपक्ष नेतेपद जाईल'


काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने विरोधीपक्षनेते पद त्यांच्याकडे जाईल, असं केसरकर यांनी म्हटलं. काँग्रेसकडे महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले अनेक लोक आहेत. त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका वठवावी यासाठी शुभेच्छा, असं ते म्हणाले.


राष्ट्रवादीत उभी फूट


राष्ट्रवादीत उभी फूट पडली हे जगजाहीर झालं आहे. एक कार्याध्यक्ष इकडे आणि एक तिकडे. निवडणूक आयोगाकडे जावं आणि पक्ष, चिन्हावर दावा करावा. दादांमुळेच सुप्रिया सुळे लोकसभेचा गड राखू शकल्या. बारामती मतदारसंघात अजित दादांच्या लोकप्रियतेला तोड नाही, असं केसरकर यांनी म्हटलं.


संजय राऊतांच्या भाकितांना अर्थ नाही 


लवकरच राज्याचे मुख्यमंत्री बदलतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. याला उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले की, "गावात पोपट घेऊन बसणारे ज्योतिषी असायचे. संजय राऊतांची अवस्था तशी झाली आहे. त्यांच्या भाकितांना काही अर्थ नाही. केवळ पक्षाच्या वतीने बोलायचे म्हणून ते काहीतरी बोलतात."


अजितदादाच्या शपथविधीची कल्पना होती


अजितदादांच्या शपथविधीची आधीच कल्पना होती. दादांनी जे धाडस केलं त्यामागे मुख्यमंत्री आणि उपमुमंत्र्यांचा मोठा रोल होता. यासाठीच दोघेही दिल्लीला गेले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.


'ठाकरे गटाला एकला चलो शिवाय पर्याय नाही'


उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले त्यांना एकला चलो रे शिवाय दुसरा इलाज नाही. त्यांना जो सल्ला मिळाला होता तो चुकीचा होता. आज स्टेजवर येऊन जे भाषण करताय त्यांचाच तो सल्ला असावा, असा टोला केसरकर यांनी लगावला.


पवारांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी : केसरकर


शरद पवारांना जे आवाहन करायचं होतं ते छगन भुजबळांनी केलं आहे. ते ऐकावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांची सगळी ज्येष्ठ लोक बाहेर पडली आहेत. पवार साहेबांनी आता आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी, असं केसरकर म्हणाले.


हेही वाचा


Maharashtra Politics: अजित पवारांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; राजकारणात आता पुढे काय?