Shivajirao Kardile: अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले (वय 67) (Shivajirao Kardile) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी 18 ऑक्टोबरच्या पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणातील एक परखड, लोकसंग्रही आणि सक्रिय नेतृत्व हरपले आहे.
Shivajirao Kardile: कार्यक्रमांमध्ये सहभागानंतर पहाटे प्रकृती खालावली
गुरुवारी दिवसभर कर्डिले विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. शिर्डीजवळील अस्तगाव येथे विखे पाटलांच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेस त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर सुमारे तीन वाजता, ते लोणी येथे विखे पाटलांच्या निवासस्थानी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील हे त्यांचा हात धरून पायऱ्या उतरवताना दिसले होते. यावेळी भाजप व शिवसेनेचे अनेक मान्यवर आमदारही उपस्थित होते.
Shivajirao Kardile Passes Away: शिवाजीराव कर्डिले यांचं निधन
पहाटे अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. काही महिन्यांपूर्वी कर्डिले मोठ्या आजारातून बरे झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, लोकांमध्ये मिसळण्याची त्यांची सवय आणि जनतेशी असलेली नाळ कायम राहिली. त्यामुळेच ते पुन्हा कार्यरत झाले होते.
Shivajirao Kardile: जिल्ह्याने गमावलं संघर्षातून घडलेलं नेतृत्व
मोठ्या संघर्षातून राजकारणात आलेले आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे नेते म्हणून कर्डिले यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Shivajirao Kardile: अंत्यविधीसाठी मोठ्या नेत्यांची उपस्थिती
शुक्रवार, संध्याकाळी 7.30 वाजता त्यांच्या अंत्यविधीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, जयकुमार रावल आणि राम शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत.
Shivajirao Kardile: शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.
आणखी वाचा