अहिल्यानगर : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile) हे आपल्याला सोडून गेले यावर विश्वासच बसत नाही, कालच एका कार्यक्रमासाठी आम्ही तीन तास एकत्र होतो. आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या, ते माझे राजकीय गुरू होते अशा शब्दात माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यानंतर सुजय विखे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
Shivaji Kardile Death : शिवाजीराव कर्डिले राजकीय गुरू
सुजय विखे पाटील म्हणाले की, "माझ्यासाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजेपासून 6 पर्यंत आम्ही बरोबर होतो. महापुराण कथेसाठी ते लोणीत आले होते. आम्ही एकत्र जेवण सुद्धा केलं. मला अजूनही विश्वास वाटत नाही ही घटना घडली आहे. आमची मैत्री किंवा त्यांचे नेतृत्व हे पूर्ण जिल्ह्याला अवगत होतं. प्रत्येक राजकारण किंवा निवडणूक आम्ही एकत्रित केली. राजकीय गुरू म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. प्रत्येक राजकीय चढ-उतारामध्ये आम्ही एकसंघ राहिलो. भाजप आणि महायुतीला हा फार मोठा धक्का आहे."
सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, "मणक्याचे ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झाले होते. त्यामुळे ते काल कथास्थळी न येता घरी आले होते. मला स्वतःला हा मोठा धक्का आहे. यातून बाहेर यायला मला देखील वेळ लागेल. काल आम्ही अगदी हसत खेळत, हास्य विनोद करत गप्पा मारल्या. माझ्या राजकीय प्रवासात त्यांच्या अनेक आठवणी आहेत. ते सोडून गेले यावर मला अजूनही विश्वास बसत नाही."
Rahuri MLA Death : शिवाजीराव कर्डिले यांचे निधन
भाजपचे राहुरी मतदारसंघाचे शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम काम केलं. नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.
CM Devendra Fadnavis : जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डीले यांच्या निधनाने कर्डीले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
ही बातमी वाचा: