अहमदनगर : 'सुबह का भुला शाम को घर आया, तो उसे भुला नही कहते', हे वाक्य म्हणत शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज ठाकरे गट शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उद्धव ठाकरे गटातील प्रवेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


पूर्वीचा कोपरगाव (Kopargaon) आणि त्यानंतर शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) नामांतर झालेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ. आतापर्यंत शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळाली. 2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchaure) यांनी विजय मिळवला. 2009 साली काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांचा पराभव करत वाकचौरे खासदार झाले. मात्र 2014 साली शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेच शिवबंधन तोडून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारी घेतल्यानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला.


याचवेळी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना अचानक उमेदवारी मिळून अवघ्या 17 दिवस प्रचार करत त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. शिवसेना व काँग्रेस असा प्रवास केलेले भाऊसाहेब वाकचौरे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये रमले नाही आणि अवघ्या वर्षभरातच त्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला. 2014 साली स्वबळावर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली. मात्र त्या ठिकाणीही वाकचौरे यांना अपयशाला सामोर जावं लागलं. 2014 पासून भाजपात असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2019 च्या लोकसभेत अपक्ष उमेदवारी केली, मात्र त्यात त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले. आगामी 2024 च्या दृष्टीने पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतले असून आज त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मुंबईत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. 


2019 मध्ये शिवसेना भाजप एकत्र होती, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आणि त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. बदललेल्या समीकरणांनुसार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत खासदारकीची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 2009 पासून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत. पूर्वी उद्धव ठाकरे गटात असलेले लोखंडे सध्या शिंदे गटात दाखल झालेले आहेत.  रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी सुद्धा यावेळी शिर्डीतून उमेदवारी मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत जनता माझ्या पाठीशी होती, यापुढे राहील, असा विश्वास दाखवत आगामी 2024 मध्ये उमेदवारीबाबत पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य राहील, असं लोखंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 


महाविकास आघाडीला विश्वासात घ्यावे लागेल.... 


दरम्यान आत्तापर्यंत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या मतदारसंघात होत असल्याने दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. कोणी कोणाला कोणत्या पक्षात प्रवेश द्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न, मात्र उमेदवारी देताना महाविकास आघाडीला विश्वासात घ्यावे लागेल, असे स्पष्ट मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीची तयारी आता सुरू झाली असून भविष्यात अजूनही अनेक पक्षप्रवेश सोहळे होतील. शिवसेनेत दोन गट, राष्ट्रवादी दोन गट, त्याचबरोबर इच्छुकांचे पक्ष बदल ही सगळी राजकीय परिस्थिती पाहिली तर श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदार कोणावर श्रद्धा दाखवतील आणि कोणाला सबुरीचा सल्ला देणार हे समजण्यासाठी 2024 ची वाट पाहावी लागेल, हे मात्र नक्की.



इतर महत्वाची बातमी : 


Uddhav Thackeray : भाऊसाहेब वाकचौरेंनी 'शिवबंधन' बांधले, ठाकरेंची शिर्डीत ताकद वाढली