अहमदनगर : "साहेब प्यायला पाणी नाही, पिके करपून चालली, शिर्डी विमानतळासाठी जमिन्या दिल्या, मात्र गावचा विकास नाही," असा व्यथा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी मांडल्या. आज उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या गावांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देत तसेच विद्यार्थ्यांकडून शिदोरी घेत दुष्काळ दौरा केला. 


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दुष्काळी दौऱ्यानिमित्त अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. इथल्या स्थानिकांनी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना हेच सांगितलं की, "शासन आपल्या दारी कार्यक्रम आमच्याच गावात झाला, पण आमच्या गावाला कोणतीही मदत मिळाली नाही. आतापर्यंत पीक विमा कंपन्या असो किंवा सरकार असो सर्वांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले." उद्धव ठाकरे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिर्डी (Shirdi) जवळच्या काही गावांमध्ये गेले. दरम्यान आज काही भागात रिमझिम पाऊस सुरु झाला आहे, तरी या पावसाचा कोणताही सकारात्मक परिणाम पिकांवर होऊ शकणार नाही. पीक नव्याने उभं राहणे अशक्य असल्याचं शेतकऱ्यानी सांगितले. 


उद्धव ठाकरे हे आज अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या ठिकाणी अनेक भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. याचबरोबर संगमेनर तालुक्यातील तळेगाव येथे दुष्काळग्रस्त (Maharashtra Drought) शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द गावातील शेतीची पाहणी केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना, घटनाबाह्य सरकार जिल्ह्यात सभा घेतंय, पण शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घटनाबाह्य सरकारकडे तोडगा नाही. पण शिवसेना नेहमी बळीराजासोबत आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे लवकरात लवकर शासन दरबारी न्याय मिळावा, दुष्काळ जाहीर होऊन मदत मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. 


कोणीही धीर सोडू नका, काळजी करु नका.... 


नाशिक (Nashik) विभागात सरासरीच्या खूपच कमी पाऊस पडलेला आहे. अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे पीकही धोक्यात आली आहेत. पाणीसाठा आटू लागला आहे.  विहिरींनी तळ गाठला आहे, अनेक मोठमोठ्या धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जलसाठा उपलब्ध नाही. पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथील काकडी गावातील बाजरी, सोयाबीन शेतीची आज पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. "कोणीही धीर सोडू नका, काळजी करू नका, काही दिवसांनी परत येतो," असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी देत निरोप घेतला. 


विद्यार्थ्यांकडून मिळाली शिदोरी 


उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना अचानक एका विद्यार्थ्याने ठाकरे यांना शिदोरी भेट दिली. जिल्ह्यातील रांजणगाव येथील एका शाळकरी विद्यार्थ्याने दौऱ्याच्या गडबडीत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. शिवाय विद्यार्थ्याने आणलेली शिदोरी घेत काय आणलं? तू खाल्लं का? अशी विचारपूस उद्धव ठाकरे यांनी केली. दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शेती पिकांचे मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याचबरोबर सरकारकडून मदत कधी मिळणार असा सवाल ही येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला तर जिल्ह्यातील काकडी या गावाजवळच शिर्डी विमानतळ उभारण्यात आलं. त्यावेळी हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली. गावकऱ्यांना विकासाचे आश्वासन दिले मात्र गावचा विकास रखडल्याची तक्रार सुद्धा काकडी गावकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Uddhav Thackeray Ahmednagar : ठाकरे बांधावर, संवाद साधत व्यथा ऐकल्या, ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन निघाले