अहमदनगर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या अहमदनगरच्या (Ahmednagar News) पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चार दान पेट्या फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. हा संपूर्ण प्रकार  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या या आरोपींचा शोध सुरुय आहे. मात्र या घटनेनं तालुक्यात भितीचं वातावरण पसरलंय. 


मंदिरातील चोरीचा हा प्रकार दुसर्‍या दिवशी मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. वृद्धेश्वर येथे झालेल्या चोरीच्या घटनेचा भाविक भक्तांसह घाटशिरस ग्रामस्थ देवस्थान समिती यांच्याकडून देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद केले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून चार-पाच अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील चार दान पेट्या उचलून पाठीमागील बाजूस नेल्या. मात्र मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात ज्या ठिकाणी आदिनाथांचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या ठिकाणची दानपेटी मात्र चोरट्यांना उचलता आली नाही. मंदिराच्या पाठीमागे वाहणाऱ्या नदीजवळ चार दान पेट्या नेऊन त्या कटरने फोडल्या. त्यातील लाखो रुपयांच्या नोटा चोरट्यांनी लंपास केल्या. मात्र दानपेटीतील चिल्लर मात्र आहे तशीच ठेवण्यात आली. दानपेटीतील भाविक भक्तांनी दान केलेल्या काही सोन्याचांदीच्या वस्तू देखील चोरट्यांनी लंपास केल्या.


पोलिसांचा तपास सुरू


मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची माहिती समजल्यानंतर पाथर्डी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पथकातील रक्षा या श्वानाने मंदिरातील पाठीमागील नदीजवळ टाकलेल्या दानपेट्यापासून तपासाला सुरुवात केली. वृद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या राम मंदिरापासून पुढे सावरगाव घाट या डांबरी रस्त्यापर्यंत श्वानाने चोरटे गेल्याची दिशा दाखवली. त्यापुढे मात्र चोरटे वाहनाच्या मदतीने फरार झाले असावेत असा पोलिसांचा संशय आहे.


मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या  मंदिरात प्रवेश करून दानपेटी पळवण्यापर्यंत आता चोरट्यांचे धाडस पोहोचल्याने आता पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न भाविक विचारात आहेत. ही चोरीची घटना कळल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या चोरीनंतर आता मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


हे ही वाचा :                          


जालन्याच्या प्रसिद्ध 'मत्स्योदरी' देवीच्या मंदिरात चोरी, दानपेटी फोडून चोरट्यांनी लंपास केली रोख रक्कम