अहमदनगर  (Ahmednagar) : नऊ वर्षीय मुलाचा चेंदामेंदा झालेला हात (Hand) पुन्हा बसवण्याची किमया अहमदनगरमधील डॉक्टरांनी केली आहे. आर्यन शिवदास लाड असं या मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. आर्यन लाड हा मूळचा बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावचा आहे. अहमदनगरमधील डॉ. अविनाश गाडेकर यांनी आपल्या टीमसह आठ तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतर आर्यनाचा हात बसवला.


मशीनमध्ये हात गेला अन्...


आर्यन लाड हा घरी आल्यानंतर आपल्या वडिलांना जनावरांना खाण्यासाठी कडबाकुट्टी कापण्यासाठी मदत करत होता. त्यावेळी त्याचा उजवा हात चुकून मशीनमध्ये गेला, यात त्याच्या हाताचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्याच्या उजव्या हाताची पाच बोटं आणि कोपऱ्यापर्यंतचा हात अक्षरशः सोलून निघाला. त्याच्या हाताच्या रक्तवाहिन्या आणि सर्व हाडे तुटली. यामुळे कुटुंबीय अतिशय घाबरले.


रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली शस्त्रक्रिया सकाळी साडेसहा वाजता संपली


आर्यनच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर आर्यनला अहमदनगरच्या निरॉयन प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे डॉ.अविनाश गाडेकर यांनी आपल्या टीमसह आर्यनवर आठ तासांची शस्त्रक्रिया केली. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली शस्त्रक्रिया सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरु होती.


कुटुंबियांकडून डॉक्टरांचे आभार


निरॉयन प्लस हॉस्पिटलचे शस्त्रक्रिया विभागाचा स्टाफ आणि प्लॅस्टिक सर्जन डॉ.दमाने यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. ऑपरेशन दरम्यान त्यांना आर्यनचा हात पुन्हा जोडण्यात यश आलं. आर्यनचा हात हा काढून टाकण्याची परिस्थिती असताना डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने आर्यनचा हात वाचला. यामुळे कुटुंबियांकडून समाधान व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले आहेत.


नागपुरात रुग्णाला शुद्धीवर ठेवून केली मेंदूवरील शस्त्रक्रिया


काही दिवसांपूर्वी अशीच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नागपुरात करण्यात आली होती. नागपुरात दोन रुग्णांवर त्यांना बेशुद्ध न करता शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली. मेंदूत असणारी  गाठ काढण्याकरता असणारी अतिशय किचकट शस्त्रक्रिया नागपुरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया "Awake Craniotomy" या तंत्राच्या मदतीने करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी फक्त आवश्यक अवयव बधीर केले जातात. दोन्ही रुग्णांचे आवश्यक समुपदेशन केल्यानंतर मेंदूमध्ये गाठ असलेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया करुन गाठ पूर्णपणे बाहेर काढण्यात आली. या शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टर्स सातत्याने रुग्णांशी बोलत होते. ज्यामुळे रुग्ण प्रतिक्रिया देत आहे हे त्यांच्या लक्षात येत होते. शस्त्रक्रियेच्या वेळेला रुग्णांना वेदना होऊ नये म्हणून सलाईनद्वारे वेदनाशामक औषधही दिली जात होती. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून रुग्णालयातून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.


 


हेही वाचा


Nashik News : खाजगी डॉक्टरकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ! उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी कापला डावा पाय, रुग्ण दोन्ही पायाने अधु