अहदमनगर : मराठा आंदोलनानंतर (Maratha Reservation) धनगर आंदोलन चांगलंच पेटलं असून गेल्या 6 सप्टेंबरपासून हे आंदोलन आजपर्यंत सुरु आहे. पहिल्या दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असून त्यांनतर कालच मुख्यमंत्र्यासोबत शिष्टमंडळाची बैठक झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली. यानंतर हे आंदोलन सुरूच राहो; अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे.


या 17 दिवसांत नेमकं आंदोलनात काय काय घडलं, यावर एक नजर टाकुयात... 


राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Arakshan) मागणीसाठी जालनाच्या अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची धग कुठे शांत होते न होते तोच 6 सप्टेंबरला अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू केले. जनजातीय कार्य मंत्रालयाचा वार्षिक अहवालात धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात आहे, त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या (Yashwant Sena) वतीने हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, जसं जसे दिवस पुढे सरकत गेले तसं तसे आंदोलन आणखी तीव्र होत गेले.


विखे पाटलांवर भंडारा उधळला 


दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आंदोलकांची भेट घेतली. सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका रोहित पवारांनी केली. दरम्यानच्या काळात ज्या जिल्ह्यात हे उपोषण सुरू आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी (Radhakrushna Vikhe) आंदोलनाची दखल घेतली नाही, म्हणून त्यांना सोलापूरात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शंकर बंगाळे या धनगर युवकाने त्यांच्या अंगावर भंडारा उधळला त्यावरूनही प्रचंड राजकारण पेटले. त्यानंतर 11 सप्टेंबरला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील चौंडीत येऊन उपोषकर्ते यांची भेट घेतली. त्यावेळी निवडणूक आली की भाजप (BJP) धनगर समाजाला आणि इतरही समाजाला आरक्षणाचे आश्वासन देते. मात्र, इलेक्शन झाल्यावर त्यांना विसर पडतो असं म्हणत त्यांनी हे सरकार जुमलेबाज सरकार असल्याची टीका केली होती.


रोहित पवार यांनी घेतली भेट 


दरम्यानच्या काळात अहमदनगरचे (Ahmednagar) पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी चौंडीत जाऊन आंदोलकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला त्याबाबत शासकीय दौरा देखील आला पण अचानक त्यांनी हा दौरा रद्द केला. यावरूनही आंदोलकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यातच 15 तारखेला उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. तर दुसरे उपोषकर्ते सुरेश बंडगर यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात कर्जत -जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातही यावरून कलगीतुरा रंगला. माजी मंत्र्यांच्या गावात हे उपोषण सुरू असताना सरकारमधील एखादा मोठा नेता उपोषणस्थळी आणता येत नसेल तर राम शिंदे यांचे पक्षातील वजन कमी झाले आहे की काय? अशी टीका रोहित पवार यांनी केली. लागलीच भाजप आमदार राम शिंदे मराठवाड्यात सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाऊन मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनाच्या तीव्रतेची कल्पना दिली. 


गिरीश महाजन यांच्याकडूनही भेट 


त्याच दिवशी म्हणजेच 16 सप्टेंबरला रात्री भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयात उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची भेट घेतली आणि त्यानंतर चौंडीत जाऊन उपोषकर्ते यांना दोन दिवसात बैठक घेतो असं आश्वासन दिलं.. मात्र, गिरीश महाजन यांनी जरी आश्वासन दिले तरी 17 सप्टेंबरला राज्यभरातुन हजारो धनगर बांधव हे चौंडीत या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी धनगर बांधवांशी चर्चा करून 20 तारखेला खंबाटकी घाटात रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. 19 सप्टेंबरला जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावल्या त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दरम्यान गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर दोन दिवस होऊन देखील सरकारकडून चर्चेचे निमंत्रण न आल्याने खंबाटकी घाटासोबतच राज्यातील 25 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तरीही सरकारने चर्चा करण्याबाबत सकारात्मकता न दाखवल्याने चौंडीतील उपोषकर्ते सुरेश बंडगर यांनी पाणी देखील सोडून दिले. 


मुख्यमंत्र्यांसोबतच बैठक ठरली निष्फळ 


त्यानंतर मात्र सरकार खडबडून जागे झाले आणि 21 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, धनगर समाजाचे प्रमुख नेते आणि यशवंत सेनेचे शिष्टमंडळ यांच्यात मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली. चौंडीतील यशवंत सेनेच्या शिष्टमंडळात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे यांचा समावेश होता. या बैठकीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, मात्र आंदोलकांनी समाधानकारक चर्चा झाली नसल्याचे म्हणत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. उपोषणाच्या 16 व्या दिवशी चौंडीतील उपोषकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृती बिघडली, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना उपोषणस्थळीच ऑक्सिजन लावण्यात आला, त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी नकार दिला. सोबतच बैठक निष्फळ ठरल्याने यापूढे वैद्यकीय उपचार देखील घेणार नाही अशी भूमिका घेतली.


तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील.


दरम्यान आज 17 व्या दिवशीही हे उपोषण सुरूच असून दरम्यान ससून रुग्णालयात उपचार घेणारे अण्णासाहेब रुपनवर यांनी चौंडीत येण्याचा आग्रह धरला आहे. शासन केवळ वेळकाढूपणा करत आहे, इतर राज्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील सुविधा दिल्या जातात, मग महाराष्ट्र राज्यात का नाही असं यशवंत सेनेचे म्हणणं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे, दरम्यान आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाची बातमी : 


'पत्नीचे कुंकू पुसून आलोय, माघारी आलो तर तुझा नाही आलो तर धनगर समाजाचा'; सुरेश बंडगरांचा उपचार घेण्यास नकार