अहमदनगर चौंडी येथील धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सतरावा दिवस आहे.  सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलक उपोषणावर ठाम आहे. उपोषणकर्ते सुरेश बंडगर  यांनी वैद्यकीय उपचार नाकारले आहेत. सोबतच उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. 'मी उपोषणाला निघतानाच माझ्या बायकोचे कुंकू पुसून आलो आहे.  बायकोला सांगितले आहे की, माघारी आलो तर तुझा नाही आलो तर धनगर समाजाचा' असं म्हणून मी बाहेर पडलो आहे. त्यामुळे धनगर आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील असे वक्तव्य सुरेश बंडगर यांनी  केलाय.


 15 सप्टेंबरला उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. तर दुसरे उपोषकर्ते सुरेश बंडगर यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात कर्जत -जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातही यावरून कलगीतुरा रंगला माजी मंत्र्यांच्या गावात हे उपोषण सुरू असताना सरकारमधील एखादा मोठा नेता उपोषणस्थळी आणता येत नसेल तर राम शिंदे यांचे पक्षातील वजन कमी झाले आहे की काय? अशी टीका रोहित पवार यांनी केली. भाजप आमदार राम शिंदे मराठवाड्यात सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाऊन मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनाच्या तीव्रतेची कल्पना दिली आणि त्याच दिवशी म्हणजेच 16 सप्टेंबरला रात्री भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयात उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची भेट घेतली आणि त्यानंतर चौंडीत जाऊन उपोषकर्ते यांना दोन दिवसात बैठक घेतो असं आश्वासन दिलं.


 गिरीश महाजन यांनी जरी आश्वासन दिले तरी 17 सप्टेंबरला राज्यभरातून हजारो धनगर बांधव हे चौंडीत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले त्यावेळी धनगर बांधवांशी चर्चा करून 20 तारखेला खंबाटकी घाटात रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. 19 सप्टेंबरला जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दरम्यान गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर दोन दिवस होऊन देखील सरकारकडून चर्चेचे निमंत्रण न आल्याने खंबाटकी घाटासोबतच राज्यातील 25 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तरीही सरकारने चर्चा करण्याबाबत सकारात्मकता न दाखवल्याने चौंडीतील उपोषकर्ते सुरेश बंडगर यांनी पाणी देखील सोडून दिले. त्यानंतर मात्र सरकार खडबडून जागे झाले आणि 21 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, धनगर समाजाचे प्रमुख नेते आणि यशवंत सेनेचे शिष्टमंडळ यांच्यात मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली.


उपोषणाच्या 16 व्या दिवशी चौंडीतील उपोषकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृती बिघडली आणि त्या श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना उपोषणस्थळीच ऑक्सिजन लावण्यात आला, त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी नकार दिला सोबतच बैठक निष्फळ ठरल्याने यापुढे वैद्यकीय उपचार देखील घेणार नाही अशी भूमिका घेतली. 17 व्या दिवशीही हे उपोषण सुरूच आहे... दरम्यान ससून रुग्णालयात उपचार घेणारे अण्णासाहेब रुपनवर यांनी चौंडीत येण्याचा आग्रह धरला आहे...शासन केवळ वेळकाढूपणा करत आहे इतर राज्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील सुविधा दिल्या जातात मग महाराष्ट्र राज्यात का नाही असं यशवंत सेनेचे म्हणणं आहे...जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा :


Ahmednagar : धनगर आरक्षणासाठी चौंडीत 17 व्या दिवशी उपोषण सुरुच, चर्चा फिस्कटल्याने आज आंदोलनाची दिशा ठरणार