अहमदनगर : एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जेव्हा तुम्ही यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavhan) यांचा फोटो लावता. तेव्हा भाजपसोबत (BJP) दोस्ती करता येणार नाही, यशवंतराव चव्हाण यांनीच आपल्या पुस्तकातून भाजपवर टीका केली आहे. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा हा केवळ शरद पवार (Sharad Pawar) यांनी चालवला आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि प्रसार करण्याचे काम कोणी करत असेल तर त्यांना पूर्ण ताकदीने सहकार्य असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे यांनी लेखक हेरंब कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. नाशिकच्या (Nashik) अजित पवार गटाच्या कार्यक्रमात शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आल्याचे दिसून आले. यावर त्यांनी अजित पवार गटाला उशिरा का होईना शहाणपण सुचल्याचे सांगत 'एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जेव्हा तुम्ही यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावता. तेव्हा भाजपसोबत दोस्ती करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. पण 'देर आई दुरुस्त आये' नाशिकच्या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आल्याचे पाहायला मिळालं याचा मी मनापासून कौतुक करते, असंही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या मोबाईलद्वारे दाखवत म्हणाल्या कि, "यशवंतराव चव्हाण आपल्या पुस्तकात लिहितात की, हेगडेवारांनी सांगितलं की, तो प्रश्न जेव्हा उपस्थित होईल, तेव्हा पाहता येईल, माझी खात्री झाली की ही चर्चा व्यर्थ आहे. मी समजलो की यांना एका विशिष्ट वर्गाची फॅसिस्ट संघटना बनवायचे आहे. आपल्याला यात काहीही कर्तव्य नाही. तेव्हा आरएसएस म्हटले की मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्या मित्रांना त्या विचारापासून बाजूला ठेवतो आहे." ज्यांनी नाशिकमध्ये हे पोस्टर लावले ते यशवंतराव चव्हाण हयात होते तोपर्यंत काँग्रेसमध्ये नव्हतेच. नंतर काँग्रेसमध्ये आले आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आले. वसंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पण वैचारिक भूमिका लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकीकडे भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणे करणे आणि दुसरीकडे आपल्या कार्यक्रमांमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरणे याचा विचार करणे आवश्यक असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मी स्वतः या केसमध्ये लक्ष घालणार
अहमदनगर शहरातील लेखक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत या प्रकरणावर गृहमंत्र्यांना धारेवर धरले आहे. सुळे यावेळी म्हणाले की, सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत असून अशातच नांदेड, ठाणे, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडल्या. त्याचबरोबर जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यात आता हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, राज्यात नेमकं चाललय काय? असा सवाल करत या प्रकरणात कुलकर्णी यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी स्वतः या केसमध्ये लक्ष घालणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.