नाशिक : देवेंद्र फडणवीस जर येत्या 2024 अजित दादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री बनविणार असतील तर मी अतिशय मनापासून स्वागत करते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खूप मोठ्या मनाचे असून त्याग काय आहे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, भाऊ कसा असावा तर तो देवेंद्र फडणवीसासारखा (Devendra Fadnavis) असावा, त्यामुळे अजित दादा जेव्हा मुख्यमंत्री होतील, तेव्हा त्यांना सांगेन की यांना गृहमंत्री करू नको, कुणाला पण गृहमंत्रालय द्या, पण त्यांना देऊ नको अशी उपरोधिक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित दादांना जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचे आभार मानते. ज्यावेळी दादा मुख्यमंत्री होतील, त्यावेळी पहिला हार मला घालू द्या, अशी विनंती ही फडणवीसांना करेल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा दहा पैकी दहा मार्क होते त्यांचं डिमोशन झालं. दहापैकी पाच मार्क दिले गेले. त्याच्यात आता पुन्हा डीमोशन झालं. मुख्यमंत्र्यांवरून थेट उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यामुळे थेट अडीच मार्कवर आलं आणि त्यातही साडेतीन मार्क पासिंगसाठी लागत असतात, त्यामुळे गृहमंत्र्यांबद्दल देखील आता वाईट वाटत आहे. ज्यांनी 105 आमदार निवडून आणले त्यांना उपमुख्यमंत्री करून ठेवलं असल्याची उपरोधिक टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपच्या शासन काळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन झाले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना अतिशय संतापजनक आहे. समतेच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली.‌ हे अतिशय चिंताजनक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. त्यांचे गृहखात्याकडील अक्षम्य दुर्लक्ष सामान्यांच्या जीवावर बेतत आहे. सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. या गुंडाना कोण अभय देतेय याचीही कसून चौकशी होण्याची गरज आहे. या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने गजाआड करा. या हल्ल्याचा तीव्र निषेध सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. 


जेव्हा जेव्हा हे गृहमंत्री होतात


राज्यात घडणाऱ्या घटनांचे खापर हे संबंधित अधिकारी प्रशासनावर फोडलं जात आहे मात्र मंत्री बाजूला होत असल्याचा दिसून येत असल्याचा देखील सुळे यांनी सांगितलं अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही. गृहमंत्रालयाने (Home Ministry) तातडीने यावर निर्णय घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीचे सरकार असताना अजित दादा यांनीच गुटखाबंदीचा निर्णय राज्यात घेतला होता. गुटखाबंदी संदर्भात आम्ही सर्वजण दादांना भेटलो होतो. त्यावेळी एका फटक्यात गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता, पण आता तुम्ही बघत असाल तर कुठेही गुटखाबंदी झाल्याचा दिसत नसल्याचे सुळे म्हणाल्या. आमच्या काळात कुठेही कोयता गॅंग नव्हती, मात्र आत्ताच्या गृहमंत्र्यांच्या काळात कोयता गॅंग वाढले आहेत. जेव्हा जेव्हा हे गृहमंत्री होतात, तेव्हा तेव्हा नागपूरमध्ये क्राईम रेट वाढलेला दिसून येतो, या हल्ल्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात असून त्यांना अभय दिले जात आहे, अशी आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.


इतर महत्वाची बातमी : 


तुम्ही तुमची अन् तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा, आमची काळजी करू नका; चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना थेट खडसावलं