अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या उपोषणादरम्यान सरकारचे अनेक डाव हाणून पाडले. आता सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 14 तारखेला मुदत संपत आहे. त्याबरोबर मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली असून अंतिम टप्प्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, तसेच आता सरकारला टप्प्यात घेण्याची वेळ आलीय, असा इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 


मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या ते उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून अहमदनगर शहरातील रेणुका माता मंगलकार्यालयात मनोज जरांगे यांची भव्य सभा झाली. हजारोंच्या संख्येने लोक या सभेसाठी जमा झाले होते. यावेळी जेसीबीमधून फुलं टाकत जरांगे पाटील यांच भव्य स्वागत करण्यात आलं. 14 तारखेला सर्वांनी अंतरवली सराटीत येण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी नगरकरांना केले. मराठा आरक्षणासाठी जे जे काही आवश्यक पुरावे हवे होते, ते सरकारला मिळाले आहे. आता सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावे, अन्यथा 40 दिवसांनंतर ते कसे घ्यायचे, ते आम्ही घेऊच, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला. 


यावेळी जरांगे म्हणाले की, सरकारला आम्ही 40 दिवस दिले आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास देणार नाही. काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, या चाळीस दिवसात त्यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, याची तजवीद करावी. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, त्यासाठी त्यांनी तयारी करावी आणि त्यांना ती करावी लागणार आहे, त्याशिवाय आम्हीही मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगरमध्ये दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्याला निर्णय घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा एवढा एकच शासन निर्णय पाहिजे, बाकी काही नको. सरकारकडून हालचाली सुरु झाल्याचे समजते आहार. त्यास्तही मराठवाड्यात समिती काम करत असून सरकार आमच्या मागणीनुसार काम करते आहे, याचा अर्थ आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा विश्वास देखील जरांगे यांनी व्यक्त केला. 


40 दिवस संपल्यावर सर्वांना 'टप्प्यात' घेऊ


'गावामध्ये एका आडनावाचे अनेक कुटुंब वास्तव करतात, जर कुटुंबातील एका माणसाचा पुरावा मिळाला आणि इतरांचा पुरावा मिळाला नाही, तर इतरांना तुम्ही ग्राह्य धरणार नाहीत का? असा सवाल यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पाच हजार नोंदीच्या सापडल्या आहेत. त्या पुराव्याच्या आधारे सरसकट मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे, सरकारला याबाबत कायदा पारित करावाच लागेल आणि आम्ही त्याबाबत ठाम असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केलं. सोबतच आमची मागणी ही केंद्र सरकारकडे नसून राज्य सरकारकडे आहे, असं त्यांनी म्हंटलं. आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना केवळ रजेवर पाठवलं, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला होती, असं म्हणत त्यांनी काहीशी नाराजी देखील व्यक्त केली. त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होती, याचा मेळच आम्हाला लागत नाही, पण 40 दिवस संपल्यावर सर्वांना 'टप्प्यात' घेऊ असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! मराठा समाजाला ठरलेल्या मुदतीत आरक्षण मिळणं अवघड; अडचणी काय?