अहमदनगर : भर हिवाळ्यात अहमदनगर (Ahmednagar) शहरातील नागरिकांना पाणी प्रश्नाचा (Water Issue)  सामना करावा लागण्याची शक्यता असून, त्याचं कारण म्हणजे अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) कोणत्या क्षणी खंडित होऊ शकतो. याबाबत मुळा धरण प्रशासनाने अहमदनगर महानगरपालिकेला (Ahmednagar Municipal Corporation) एक पत्र पाठवून याबाबत माहिती देखील दिली आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडे तब्बल 6 कोटी 97 लाख 50 हजार 219 रुपयांची पाणीपट्टी थकीत असून, ती त्वरित भरण्यात यावी अन्यथा पाणीपुरवठा कोणत्या क्षणी खंडित होईल असा इशारा मुळा पाटबंधारे विभागाने (Mula Irrigation Department) दिला आहे.


अहमदनगर महानगरपालिकेकडे ऑक्टोबर महिन्यापर्यंत 6 कोटी 97 लाख 50 हजार 219 रुपयांची बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. दरम्यान, महानगरपालिकेने 28 डिसेंबर रोजी 18 लाख 97 एवढ्याच रकमेचा भरणा केला. सोबतच सर्व जल मापकांचे नोंदणीकृत संस्थेकडून मोजमाप तंत्र प्रमाणपत्र पाठबंधारे कार्यालयात सादर केलेले नाहीत. त्यामुळे पाणीपट्टी थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि मोजमाप तंत्र प्रमाणपत्र पाठबंधारे कार्यालयात सादर करावे यासाठी महानगरपालिकेला पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच असे न झाल्यास करारनाम्यातील अटी व शर्ती मधील अट क्र. 9 नुसार पाणी पुरवठा कुठल्याही क्षणी खंडित करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. 


पत्रात नेमकं काय म्हटले आहे? 


महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या पत्रात मुळा पाटबंधारे विभागाने म्हटले आहे की, "महाराष्ट्र जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 अन्वये बिगर सिंचन ग्राहकांनी नोंदणीकृत संस्थेकडून मोजमाप तंत्र बसवून जल मापक यंत्र बसविणे आवश्यक आहे. तथापि या शाखा कार्यालयाने आपल्या संस्थेला जलमापक यंत्राचे नोंदणीकृत संस्थेकडून मोजमाप करण्याबाबत वारंवार कळविले आहे. परंतु, अद्याप पर्यंत महानगरपालिकेने सदरील प्रमाणपत्र सादर केलेले नाही. परिणामी आपल्या संस्थेला महाराष्ट्र जलसंपती नियमन प्राधिकरण यांचे आदेशान्वये दुप्पट दराने आकारणी होत आहे. सद्यस्थितीत आपल्या मुळानगर येथील पंपगृहामध्ये तीन पैकी एक जल मापक बंद आहे."


तसेच, महानगरपालिकेकडे  ऑक्टोबर अखेर 6 कोटी 97 लाख 50 हजार 219 रुपये एवढी एकूण बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. महानगरपालिकेने 28 डिसेंबर 2023  रोजी केवळ 18 लाख 97 एवढ्याच  रकमेचा भरणा केलेला आहे. हे अत्यंत खेदजनक तरी आपण त्वरित सर्व जल मापकांचे नोंदणीकृत संस्थेकडून मोजमाप करून प्रमाणपत्र या कार्यालयाला सादर करावे. तसेच उर्वरित पाणीपट्टी थकबाकीचा त्वरित भरणा या कार्यालयाला करावा हि विनती. अन्यथा करारनाम्यातील अटी व शर्ती मधील अट क्र. 9 नुसार आपण पाणी पट्टी वेळेवर न भरल्यामुळे आपला पाणी पुरवठा कुठल्याही क्षणी खंडित करण्यात येईल, असे मुळा पाटबंधारे विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pune Water Supply : पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, चारही धरणात दहा टक्के पाणीसाठा कमी