अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये एका विहिरीत शीर, हात नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील विहिरीत काल बुधवारी (दि. 12) सकाळी आढळला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर या मृतदेहाटी ओळख पटवण्याचं आव्हान देखील पोलिसांसमोर असणार आहे.
हा मृतदेह वीस वर्षीय तरुणाचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा-शिरुर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा आहे? याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तातडीने या घटनेचा तपास सुरू केला.
दाणेवाडी येथील विठ्ठल दगडू मांडगे यांच्या मालकीची ही विहीर आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी केली, कुठे केली, व का केली, या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर त्याची ओळख पटवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत.
गावातील एक तरुण काही दिवसांपासून बेपत्ता
दाणेवाडी येथील एक वीस वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तो शिरुर येथील सीटी बोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. मात्र, या मृतदेहाला शीर नसल्याने ओळख पटलेली नाही. मात्र हा मृतदेह वीस वर्षीय तरूणाचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.