आज कृषी दिन...बळीराजाचा दिवस.. बळीराजाच्या आयुष्यात समृद्धी येवो..पीक पाणी चांगलं होवो..शेती क्षेत्राला सोन्याचे दिवस येवो..याच एबीपी माझाच्या आणि सातबाराच्या बातम्यांकडून शुभेच्छा.

 

महाराष्ट्राचं आद्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांना मानाचं स्थान मिळवून देणारे छत्रपती शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हरितक्रांतीचे जनक आणि ज्यांची आज जयंती आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राला खूप मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांनी राज्यातील कृषी क्षेत्राची पायाभरणी केली. शेतकऱ्यांना समजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ज्याचे चांगले परिणाम आज दिसत आहे.

 

छत्रपती शिवरायांचं कृषी धोरण

जाणता राजा..कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा राजा...म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज..शिवाजी महाराजांची शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक धोरणं राबवली, राज्यात जलसंधारणाची अनेक कामं केली. त्याकाळी त्याचे शेती विषयीचे विचार हे आजच्या काळातही विचार करायला लावणारे आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळी मामल्याच्या सुभेदार रामजी अनंत याला 5 सप्टेंबर 1676 ला पाठवलेल्या पत्रात म्हणतात. -

 

" इमाने इतबारे स्वामीकार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे. रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे  "

 

याच पत्रात ते पुढं म्हणतात..

" ज्या गावी जातील तेथील सर्व कुणबी गोळा करावे. बैल, नांगर आणि पोटाकरिता धान्य नसल्यामुळं जो अडून निकामी झाला असेल त्याला दोन चार बैलांकरिता रोकड हाती देऊन आणि पोटाकरिता दोनचार खंडी धान्य द्यावे. त्याच्याने शेत करवेल ते करवून घ्यावे, नंतर बैलाचे व धान्याची रोकड वाढीदिडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपती प्रमाणं वसूल करावी "

 

छत्रपतींच्या अशा अनेक पत्रातून त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे विचार स्पष्ट दिसतात. त्यामुळं समर्थ रामदारांनी छ. शिवाजी महाराजांसाठी वापरलेली जाणता राजा ही उपाधी किती सार्थ आहे याचा प्रत्यय येतो.

 

छत्रपती शाहू महाराजांचं कृषी धोरण

छत्रपती शाहू महाराजांनीही शिवाजी महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवत शेतकरी कल्याणाचा वसा घेतला. शाहू महाराजांनी करवीर संस्थानात राबविलेलं कृषी धोरण हे आजच्या सरकारला पथदर्शी असंच आहे. शाहू महाराज गादीवर आले, अन राज्यात दुष्काळ पडला..याच दुष्काळाचा त्यांनी संधी म्हणून वापर केला...संस्थानातील पाण्याचे स्त्रोत शोधले..त्यांना पुनरुज्जीवन दिलं...पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राधानगरी धरण बांधलं. 23 तलाव बांधले.. शेतीत नवनवीन प्रयोग केले..पन्हाळा , भुदरगड परिसरात चहा, कॉफीचे मळे लावले...संस्थानातील मुलांना शेतीचं उत्तम शिक्षण मिळावं यासाठी शेती शाळाही सुरु केली..एवढंच काय तर नांगर बनविण्यासाठी संस्थानातील तोफाही वितळवल्या.



आंबेडकरांचं कृषी कार्य

शाहू महाराजांप्रमाणं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही पथदर्शी आहेत. जलसंधारणाचं महत्त्व ओळखून दामोदर व्हॅलीसहिल अनेक धरणांचं काम अवघ्या 4 वर्षात पूर्णत्त्वास नेलं.

 

वसंतराव नाईकांचं मोलाचं योगदान

कृषी दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचं राज्याच्या कृषी विकासात मोलाचं योगदान आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी भूदान ही भुमीहीन शेतकऱ्यांची चळवळ उभी केली. आणि याच चळवळीच्या माध्यमातून 1955 साली शेतकऱ्यांना 5 हजार एकर जमिनीचं वाटप करण्यात आलं. वसंतराव मुख्यमंत्री असताना 1966 साली भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळात वसंतरावांनी राज्याचा झंझावाती दौरा केला. दुष्काळामागची कारणं शोधली. आणि शेततळी, लघुपाटबंधारे प्रकल्प आणि पाणी आडवा, पाणी जिरवा अशा उपायांच्या माध्यमातून शेतीला पुन्हा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. 1972 ते 1975 च्या कालखंडात देशात हरितक्रांतीचे वारे वाहत होते. याच काळात महाराष्ट्रात हरित क्रांतीचे बीजं वसंतरावांनीचं रोवली.

 

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते वसंतरावांपर्यंत सगळ्यांनी कृषी क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं. त्याचे विचार, कार्य आजही आपल्याला मार्गदर्शक असेच आहेत.