पुद्दुचेरी : सुपरस्टार रजनीकांतच्या कबाली चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. एअर एशियाकडून थलैवा रजनीला आगळीवेगळी मानवंदना दिलेली असताना पुदुच्चेरीत एक अनोखी योजना आणण्याची तयारी सुरु आहे. घरात स्वच्छतागृह बांधा आणि कबाली सिनेमाचं मोफत तिकीट मिळवा, ही ऑफर असेल.

 
घरातच स्वच्छतागृह बांधण्याचं महत्त्व समजावण्याचे प्रयत्न अनेक पातळींवर केले जातात. पुदुच्चेरीमधील सेल्लीपेटच्या गावकऱ्यांमध्येही अशाचप्रकारे जनजागृती करण्यासाठी पंचायतीने पावलं उचलली आहेत. घरात स्वच्छतागृह बांधा आणि कबाली सिनेमाचं मोफत तिकीट मिळवा अशी पंचायतीची योजना आहे.

 
ग्रामीण विकास संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात सेल्लीपेट गावात 772 घरं असून त्यापैकी केवळ 447 घरांमध्येच स्वच्छतागृहं असल्याचं समोर आलं. गावात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ही योजना आखली आहे.

 
सेल्लीपेट गावात रजनीकांतच्या चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे. सिनेमाचं मोफत तिकीट मिळवण्याच्या बहाण्याने का असेना, रहिवासी घरात स्वच्छतागृह बांधतील अशी अटकळ बांधली जात आहे. पुदुच्चेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी रजनीकांतला स्वच्छ भारत अभियानाचे सदिच्छादूत होण्याची विनंती केली आहे.