यादव यांनी मुंबईमध्ये एमआरव्हीसीच्या कामांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी रखडलेली कामे फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी सूचना देखील दिल्या आहेत. तसेच सीएसएमटी स्टेशनचे निरीक्षण केले. यावेळी ते म्हणाले की, जास्तीत जास्त प्रवासी सुविधा कशा देता येतील याकडे लक्ष देण्यात येईल. काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या आम्ही इथून जास्तीत जास्त ट्रेन चालवू शकत नाहीत. जास्तीत जास्त ट्रेन कशा चालवता येतील यावर आमचा भर असेल, असे ते म्हणाले.
येणाऱ्या 50 वर्षात सीएसएमटी स्टेशनवर किती भार पडेल. इथे प्रवाशांकडून किती मागणी वाढेल याचा विचार करून येणाऱ्या काळात क्षमता वाढवण्यासाठी आम्ही टप्याटप्याने काम करणार आहोत, असे यादव म्हणाले.
भारतीय रेल्वेत मागणी जास्त आहे, पण क्षमता कमी आहे, त्यामुळे आता क्षमता आम्ही वाढवणार आहोत, असे यादव यांनी सांगितले.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ज्याचे काम 2007 ला सुरू झाले होते ते आता पूर्ण होत आले आहे. 2021 पर्यंत पूर्ण 3000 किमीचा कॉरिडॉर आमचा पूर्ण होईल. त्यामुळे दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता या दोन मार्गावर असलेली सर्वात जास्त मागणी आम्ही पूर्ण करू. यामुळे आमचे आताचे मार्ग फ्री होतील, असे देखील त्यांनी सांगितले.
येणाऱ्या 4 वर्षात दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर 200 ते 250 नवीन ट्रेन आम्ही चालवणार आहोत. या सर्व ट्रेन 160 किमी पेक्षा जास्त वेगाने चालणार आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधा आता बनवत आहोत, अशी माहिती देखील यादव यांनी दिली.