Vidarbha Rain: पावसाचा कहर, चंद्रपूरात वीज पडून एक युवक ठार, अकोला-वर्धा येथे जनावरांचा मृत्यू
मान्सून पूर्व पावसाचा कहर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सुरु असून शेतकऱ्यांचा काही अंशत दिलासा मिळाला आहे. तसेच चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, अमरावती, यवतमाळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
![Vidarbha Rain: पावसाचा कहर, चंद्रपूरात वीज पडून एक युवक ठार, अकोला-वर्धा येथे जनावरांचा मृत्यू A young man was killed in a lightning strike in Chandrapur and animals died in Akola Wardha Vidarbha Rain: पावसाचा कहर, चंद्रपूरात वीज पडून एक युवक ठार, अकोला-वर्धा येथे जनावरांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/becc3678524b2e9f960ffee6bf0bf453_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः विदर्भात मॉन्सून दाखल झाला नसला तरी आलेल्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना काही अंशत दिलासा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एका तरुणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे.
वीज पडून युवकाचा मृत्यू
चंद्रपूर : शेतात काम करीत असताना वादळी वाऱ्यासह वीज पडून एका 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. तर 5 मजूर गंभीर जखमी आहेत. वरोरा तालुक्यातील दिंदोडा शेत शिवारातील घटना, सोहम हरिदास काळे (20) असे मृताचे नाव आहे. शनिवारी दुपारच्या दरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व मजूरांनी शेतात असलेल्या एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याच दरम्यान वीज पडली. जखमींना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बुलढाण्यातही मुसळधार
बुलढाणाः जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात सायंकाळी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने सोनाळा नदीला पूर आल्याने काही शेळ्या वाहून गेल्या. नेमक्या किती शेळ्या वाहून गेल्या याची अद्याप माहिती नाही. मात्र पहिल्याच पावसाने नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.
पशुपालकाचे मोठे नुकसान
वर्धाः वर्धा जिल्ह्यात अनेक भागात सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पाऊस बरसला. वर्धा शहरालगत असलेल्या झाडगव बेलगाव शिवारातील शेळ्या गावातील गावठाण परिसरात असताना अचानक विज पडल्याने पाच शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. मनुष्य हानी झाली नसली तरी गावातील पशुपालकांचे नुकसान झाले आहे. घटनेची महिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
मूसळधार मान्सूनपूर्व पाऊस
अमरावतीः आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये कुठे ऊन तर कुठे ढगाळी वातावरण होते. आज दुपारी अमरावती शहरात कडक उन्ह तापल्या नंतर अचानक वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने सुरुवात झाली. यावेळी बाजारपेठ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसमुळे नागरिकांना उकड्यापासून सुटका मिळाली आहे.
अकोल्यात लाखोंचे नुकसान
अकोल्यात सुरु असलेल्या पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या शिवापुर स्थानकावर लाखो रूपयांचे सिमेंट आणि खतांची शेकडो पोती भिजली. यात व्यापाऱ्यांचा सुमारे 30 ते 40 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यासोबतच अकोला शहरातील एमआयडीसी भागातील फेज क्रमांक तीनमधील अमरिश दालमिया परिसरात वीज पडून आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, अकोट आणि मुर्तिजापूर तालूक्यात वादळी वार्यासह जोरदार पाऊस. अकोट शहरात गारपिटीसह जोरदार पाऊस पडला.
यवतमाळमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस
नारळी गावामध्ये संध्यकाळी 4 च्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली असून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पावसासोबत झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे लाईनचे पोल जमिनीतून तुटून पडली. तसेच आनेक नागरिकांच्या घरावरील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे टीन पत्रे उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडे सुद्धा जमिनीवर कोसळून पडली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)