नागपूर: 1994 मध्ये पोलिस उपनिरिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले वसंतराव यांना एकूण पाच मुले होती. अभियंता असलेला थोरला मुलगा लग्नापूर्वीच अपघातात मरण पावला. त्यानंतर चारही मुलांचा त्यांनी व्यवस्थित सांभाळ केला. मुलांना पदवी तसेच पदव्युत्तरपर्यंत शिकवून नोकरी व व्यवसायाला लावले. लग्न करून दिले. इतकेच नव्हे, कुटुंब व व्यस्त ड्युटी सांभाळून काटकसर करत त्यांनी मुलांसाठी ३२ लाख रुपये खर्च करून बारा खोल्यांचे दोन मजली घरही बांधले. मात्र मुलांनी मेहनतीची कदर न केल्याने ते सध्या दुःखी आहेत. चारपैकी दोन मुले त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुलांनी जबरदस्तीने अर्ध्या घरावर बेकायदेशीररित्या कब्जा केला असून, दारू पिऊन शिवीगाळ व मारझोड करीत असल्याची त्यांची तक्रार आहे.


मायबाप आयुष्यभर मेहनत करून मुलांना लहानाचे मोठे करतात. शिक्षण शिकवून स्वतःच्या पायावर उभे करतात. मात्र बऱ्याचवेळा काही निष्ठुर मुले मायबापांच्या कष्टाची कदर करीत नाहीत. शुक्लानगर (ओमकारनगर चौक) येथील 90 वर्षीय ज्येष्ठ नागरिक वसंतराव देशमुख यांची अशीच काहीशी कहाणी आहे. त्यांनी पित्याचे कर्तव्य पार पाडत आपल्या चारही मुलांना आत्मसन्मानाने जगणे शिकविले. त्यामोबदल्यात मुलांकडून मात्र त्यांना शारीरिक व मानसिक वेदना मिळाल्या. न्यायासाठी या वृद्ध पित्याने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांपासून ठिकठिकाणी चकरा मारल्या. परंतु कुठेही न्याय न मिळाल्याने ते हताश झाले आहेत. 


20 वर्षांपासून घराचे टॅक्सही भरले नाही


या वादात गेल्या 20 वर्षांपासून घराचा टॅक्ससुद्धा भरला नसल्याचे ते म्हणाले. वसंतराव पहिल्या मजल्यावरील सहा खोल्या किरायाने देणार होते. मात्र एका मुलाने रागाच्या भरात दारे व खिडक्या फोडल्याने किरायेदारही यायला घाबरत आहेत. मुलांचे रंगढंग व पैशाची हाव पाहून आता त्यांनी स्वकमाईतून बांधलेले संपूर्ण घरच विकायला काढले आहे.


निवृत्त पोलिसाबाबतही प्रशासन किती गंभीर?


वसंतराव हे स्वतः पोलिस अधिकारी राहिले आहेत. त्यांनी 40 वर्षे पोलिस विभागात नोकरी केली. त्यामुळे मोठ्या आशेने ते अजनी पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेले होते. मात्र तिथेही त्यांची निराशाच झाली. पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. उलट घरगुती वाद असल्याचे सांगून त्यांना टरकावून लावले. न्यायासाठी एका माजी पोलिस अधिकाऱ्याला इतका त्रास होत असेल, तिथे सर्वसामान्यांचे काय? आणि पोलिस नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत किती गंभीर आहे, हे यावरुन दिसून येत आहे.


उरलेले आयुष्य कटकटीविना काढायचे


आयुष्यभर पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्या वसंतराव यांनी आपल्या ओळखीचा फायदा करून घेत मुलांच्या ऍडमिशनसाठी त्या काळात नासिकराव तिरपुडे व दादासाहेब धनवटेंसारख्यांचे हात-पाय जोडले होते. त्यामुळेच चारही मुले शिक्षण पूर्ण करू शकल्याचे ते म्हणाले. वसंतराव यांना दर महिन्याला 21 हजार पेंशन मिळते. त्यामुळे मी व माझी पत्नी कुणावरही बोझ नाही. आम्हाला फक्त उरलेले आयुष्य कटकटीविना काढायचे असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.


Nagpur Crime : शहरात धाडसी चोरी, मुख्य मार्गावरील स्टेट बँकेचे एटीएम न फोडता रक्कम लंपास