ED Raid Sanjay Raut : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री अचानकपणे केलेला दिल्ली दौरा आणि आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई यातील संबंधाबाबत आता नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला गेले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याची माहिती होती. या दौऱ्यानंतर आज सकाळी राऊतांच्या घरी ईडीने कारवाई करणे, या योगायोगाबाबत चर्चा सुरू झाल्यात. 


संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याचे म्हटले जात आहे. याआधी संजय राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबईतील एका चौकाच्या नामकरणाच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले होते. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे भाजप, केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू झाली होती. शिवसेनेनेदेखील आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आज, संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्याने हा मुद्दा मागे पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  राज्यात ज्या-ज्या वेळी विविध प्रश्न निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित वादग्रस्त विधानं करून मूळ मुद्द्यावरून लोकांचं आणि माध्यमांचं लक्ष वळवण्याचं काम जाणीवपूर्वक केल्याची शंका लोकांकडून निर्माण केली जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. 


शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आक्रमकपणे राऊत माध्यमांमध्ये मांडत असतात. काही दिवसांपूर्वीदेखील ईडीने संजय राऊत यांची 10 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतरही संजय राऊत यांनी आक्रमकपणा कायम ठेवला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या: