नागपूरः मागील एका आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे 19 जुलैपर्यंत जिल्हा परिषदेच्या मालकीचे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाल्याची चित्रे आहे. याचा विचार करता जिल्ह्यातील 470 तलावांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे.
जिल्ह्यातील तलाव ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ओव्हर फ्लो होत होते. मात्र पावसाच्या दमदार हजेरीमुळे जुलै संपण्यापूर्वीच 90 टक्के तलाव ओव्हर फ्लो झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निधीअभावी मागील काही वर्षात जिल्ह्यातील अेक तलावांची दुरुस्ती झालेली नसल्याने काही तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत. याचा विचार करता मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी लघु सिंचन विभागाला तलावांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा जलसंधारण अधिकारी बंडू सयाम व त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांकडून मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तलावांची पाहणी सुरू आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीचे 470 तलाव आहेत. यात गाव तलाव, मामा तलावांचा समावेश आहे.
मनुष्यबळाचा अभाव
जिल्ह्यातील तलावांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या लघु सिचंन विभागाकडे आहे. मात्र, या विभागात सहायक अभियंता व उपअभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विभागाचा कारभार चार उपअभियंत्यांच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचा परिणाम देखभाल व दुरुस्तीवर झाला आहे.
जिल्ह्यातील मामा तलावही ओव्हरफ्लो
नागपूर जिल्ह्यात सुमारे 250 वर्षांपूर्वीचे 214 मामा तलाव आहेत. जे ओव्हर फ्लो झालेले आहेत. मागील काही वर्षात निधीअभावी या तलावांची दुरुस्ती झालेली नाही. बहुसंख्य मामा तलाव दुरुस्तीला आले आहेत. जुना पाणी व देवळी खूर्द येथील तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.