मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. 'शोरगुल' या आगामी बॉलिवूडपटासाठी सिब्बल यांनी गीतलेखन केलं आहे.
सलमान खानशी झालेल्या वादाबाबत जाहीर माफीनामा मागितल्यामुळे चर्चेत आलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंगने हे गीत गायलं आहे. तर सुप्रसिद्ध झितारवादक (सितार आणि गिटारच्या संगमातून बनवलेलं वाद्य) निलाद्रीकुमार यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
सिब्बल यांनी 'शोरगुल' या सिनेमासाठी 'तू ही तू' ही कव्वाली लिहिली होती. मात्र निलाद्री कुमार यांच्यासोबत दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम करताना त्यांनी 'तेरे बिना' हे आणखी एक गाणं लिहिण्याचं ठरवलं. शोरगुल हा सामाजिक-राजकीय विषयावरील चित्रपट आहे.
तेरे बिना हे गाणं अनेकांच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. नऊ महिने या ट्रॅकवर निलाद्री कुमार यांच्यासोबत काम केल्याचं ते सांगतात. तेरे बिना हे प्रेम आणि विरह या भावनांचा मेळ गाण्यात आहे, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. तुर्की सुपरमॉडेल सुहा गेझेवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.