पुणे:  इंदापूरच्या तानाजी शिंगाडे या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीत बदल केले. नियंत्रित शेतीची कास धरली. शेडनेटमध्ये काकडीचं पीक घेतलं आणि अवघ्या तीन महिन्यात लाखोंचा नफा कमावला.

कशी साधली तानाजीने ही किमया?

पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे तानाजी शिंगाडे. एक  तरुण आणि प्रयोगशील शेतकरी. इथल्या कडबनवाडीत वडीलोपर्जित १६ एकर शेती आहे. यात पूर्वी डाळिंबाचं पीक होतं. मात्र विविध किडी आणि त्यानंतर आलेल्या तेल्यानं बागेवर हल्ला केला. उत्पन्न मिळेनासं झालं. अशातच नियंत्रित शेतीची माहिती मिळाली. शेडनेट उभं करण्याची कल्पना वडिलांना दिली. मात्र खर्च जास्त असल्यानं सुरुवातीला वडिलांनी नकार दिला. मात्र शेडनेट उभारणीसाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानातून मदत मिळत असल्यानं वडीलांनी संमती दिली.

तानाजी शिंगाडे यांनी बाजाराचा व्यवस्थित अभ्यास केला. काकडीचा पर्याय निवडला. जमिनीची मशागत करुन बेड तयार केले. याला सेंद्रीय तसंच रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. मल्चिंग पेपर अंथरला, त्याला २ फुटांवर भोकं पाडून घेतली. ठिबकच्या ड्रिपलाईन अंथरल्या. दोन बेडमध्ये ४५ सेंमी अंतर सोडलंय. पुण्याहून ८ रुपयांना एक याप्रमाणं काकडीचं बी आणलं. ४० गुंठ्यासाठी त्यांना ८ हजार बिया लागल्या. बी महाग असल्यानं घरच्या घरीच लागवड केली.

ठिबकमधून खतं आणि पाणी दिल्यानं रोपांची उगवण चांगली झाली. २० दिवसात तारकाठी केली. अवघ्या ३५ व्या दिवशी काकडी तोडणीस आली. सध्या दिवसाआड दीड ते दोन टन काकडीची तोडणी होतेय. ही काकडी क्रेटमध्ये भरुन मुंबई बाजारात पाठवली जाते.

*आतापर्यंत १४ टन काकडीचं उत्पादन मिळालं आहे.

*ही काकडी बाजारात २५ ते ३० रुपये किलोनं विकली गेलीय

*यातून तानाजी यांना २ लाख ८० हजार रुपये मिळाले आहेत.

*अजून २ महिने तोडा सुरु राहणार असून यातून ३५ टन काकडीच्या उत्पादनाची अपेक्षा तानाजी शिंगाडे यांना आहे.

*म्हणजेच तानाजी यांना अजून ७ लाख हजार रुपये मिळतील

*यातून बँकेचा हप्ता, बियाणं, खतं, किडनाशकं, वाहतूक असा २ लाख ५० हजारांचा खर्च आला.

*म्हणजेच तानाजी शिंगाडे यांना या काकडीतून अवघ्या ३ महिन्यात ७ लाखांचा निव्वळ नफा होईल.

शेतीत सतत प्रयोग करत राहण्याची तानाजी शिंगाडे यांची वृत्ती. वडील पारंपरिक शेती करत असले तरी त्यांची समजूत काढून त्यांनी शेतीत बदल केले. नियंत्रित शेतीचा मार्ग निवडला. बाजाराचा अभ्यासातून काकडीचं पीक निवडलं. अवघ्या ३ महिन्यात या काकडीनं तानाजी शिंगाडेंना पंचक्रोशीत फेमस केलंय.