मुंबईः राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून 1 जून ते 28 जून अखेर 139.4 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या 66.9 टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या 109.5 टक्के एवढा झाला होता.


 

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे बळिराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीप हंगामाची तयारी सध्या जोरात सुरु झाली आहे. राज्यातील अनेक भागात पेरणी झाली आहे.

 

राज्यातील पर्जन्यमान

सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानुसार सांगली, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अकोला या दहा जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.

 

ठाणे, धुळे, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या तेरा जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

 

नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यांत 26 ते 50 टक्के पाऊस आणि नाशिक जिल्ह्यात 0 ते 25 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

 

राज्यातील 9 टक्के क्षेत्रावर पेरणी

राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस पीक वगळून) 139.64 लाख हेक्टर असून 24 जून अखेर 13.22 लाख हेक्टर क्षेत्रावर (9 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीसाठी पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात इतर पिकांच्या पेरणीस सुरूवात झाली आहे.

 

धरणात 9 टक्के पाणी साठा

राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत सध्या केवळ 9 टक्के साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच सुमारास 25 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणेः

  • मराठवाडा-1 टक्के (7)

  • कोकण-28टक्के (42)

  • नागपूर-16 टक्के (25)

  • अमरावती-11 टक्के (32)

  • नाशिक-8 टक्के (20)

  • पुणे-7 टक्के (31)