पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून म्याव म्याव ड्रग्ज म्हणजेच एमडी (Mephedrone Drugs) जप्त करण्यात आलं आहे. दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 12 लाख रुपये असल्याचं समजतं. पोलिसांनी या कारवाईत अंमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. महंमद फारुख महंमद उमर टाक असं अटक केलेल्या तस्कराचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे.


दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकात सोमवारी (2 मे) एक इसम येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटने सापळा रचला. पाठीला सॅक लावलेला एक तरुण फूटपाथवर संशयास्पद रेंगाळताना दिसला. साध्या वेशातील पोलिसांनी महंमद टाक याला ताब्यात घेतलं. 


महंमद टाक याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 11 लाख 80 हजार रुपयांचे 118 ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून मोबाईल फोन, डिजिटल वजन काटा, 2 हजार 590 रुपये रोख, आधारकार्ड, डेबिट कार्ड असं साहित्य जप्त केले असून त्यांचे दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.


मुंबईत कस्टमकडून 27 किलोंचं ड्रग्ज जप्त
मुंबईत तीन दिवसांपूर्वी (30 एप्रिल) कस्टमकडून ही मोठी कारवाई करण्यात आली होती. तब्बल 27 किलोंचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होतं. अमेरिकेतून मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरुन कस्टमने कारवाई करत आरोपीला अटक केली. दरम्यान, मुंबई कस्टम विभागाकडून या प्रकरणातील आरोपीच्या घरी सर्च ऑपरेशन केल्यानंतर 20 किलो मारीजुआणा ड्रग्स आणि 7 किलो हशीश ड्रग्स जप्त करण्यात आलं. 


 इतर महत्त्वाच्या बातम्या