अहमदाबाद : गुजरातमधील पिपावाव बंदरातून 450 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. गुजरातचं दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) यांनी संयुक्त कारवाई करत पिपावाव बंदरावर एका कंटेनरमधून हेरॉईन जप्त केलं. हे ड्रग इराणमधून अमरेली जिल्ह्यातील पिपावाव बंदरात आणलं होतं. जप्त केलेल्या कंटनेरचं वजन सुमारे 9780 किलोग्राम आहे. याचा तपास 28 एप्रिल रोजी केला होता. 100 जम्बो पिशव्यांमधील चार संशयास्पद पिशव्यांमध्ये ड्रग्ज सापडलं. कंटेनरमधून सुमारे 450 कोटी रुपयांचे सुमारे 90 किलो हेरॉईन जप्त केलं आहे.


गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी शुक्रवारी (29 एप्रिल) सांगितलं की, अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कने अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. धागा हेरॉईनच्या द्रावणात भिजवला आणि नंतर तो सुकवला. त्यानंतर त्याला गाठीचा आकार देत बॅगमध्ये पॅक केला. हा पिशव्या सामान्य दोऱ्याच्या गाठी असलेल्या इथर पिशव्यासोबत पाठवल्या,  जेणेकरुन अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष जाऊ नये.


"धाग्याच्या मोठ्या पिशव्या असलेलं कंटेनर पाच महिन्यांपूर्वी इराणहून पिपावाव बंदरात आलं होते. सुमारे 395 किलो वजनाच्या धाग्याच्या चार संशयास्पद पिशव्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण केलं असता धागा अफू किंवा हेरॉईनमध्ये गुंडाळल्याचं स्पष्ट झालं. आम्हाला त्या धाग्यांमधून सुमारे 450 कोटी रुपयांचे सुमारे 90 किलो हेरॉईन सापडलं आहे. एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार तपास आणि जप्ती सुरु आहे, असं डीआरआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.


"डीआरआयने डिसेंबर 2021 मध्ये हेरॉईन, कोकेन, चरस आणि सायकोट्रॉपिक पदार्थ यांसारखं ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त केलं होतं. जानेवारीमध्ये 3,300 किलोहून अधिक हेरॉईन, 320 किलो कोकेन आणि 230 किलो चरस जप्त करण्यात आलं. याशिवाय 170 किलो स्यूडोफेड्रिन आणि 67 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केलं होतं," असं डीआरआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं.


तर सप्टेंबर 2021 मध्ये मुंद्रा बंदरावर 3000 किलो हेरॉईन आणि कांडला बंदरातून एप्रिल 2022 मध्ये  205 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं.