Crime News Mumbai:  झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग इडली विक्रेत्याला थेट तुरुंगात घेऊन गेला. मुंबई पोलिसांनी अंबरग्रीससह एका इडली विक्रेत्याला अटक केली. आरे कॉलनीतील रॉयल पाम विभागात अंबरग्रीस विकण्यासाठी आणले होते. जप्त करण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत 5 कोटींच्या घरात आहे. आरोपी हा वसई येथे राहणारा असून इडली विक्रेता आहे. अंबरग्रीसची विक्री झाल्यानंतर आरोपीला कमिशन म्हणून 50 लाख रुपये मिळणार होते. 


पोलिसांनी आरे कॉलनीतून अटक केलेल्या आरोपीचे नाव शेडू रामन श्रीनिवासन आहे. आरोपी वसईतच इडली सांभार विक्रीचे काम करत होता. अंबरग्रीसची विक्री केल्यास कमिशन म्हणून लाखो रुपये मिळतील असे त्याला एकाने सांगितले होते. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने ओळखीतील एका व्यक्तीकडे अंबरग्रीसची मागणी केली. हे अंबरग्रीस घेऊन तो आरे कॉलनीत विक्रीसाठी आला होता. 


अंबरग्रीसची बेकायदेशीर खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरे कॉलनीत सापळा रचला. रॉयल पाम भागात 27 एप्रिल रोजी आरोपी शेडू दुपारच्या सुमारास आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 2 किलो अंबरग्रीस जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात अंबरग्रीसची किंमत 5 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी शेडूला अंबरग्रीसचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 


अंबरग्रीस म्हणजे काय?


समुद्रात व्हेल माशांनी केलेल्या उलटीमधून अंबरग्रीस हा पदार्थ बाहेर पडतो. या अंबरग्रीसचा वापर महागडे परफ्यूम, सौंदर्य प्रसाधने आणि महागडी औषधे बनवण्यासाठी केला जातो. आपल्या देशात आणि परदेशात त्याची विक्री आणि खरेदी करणे बेकायदेशीर कृत्य समजले जाते. मात्र, त्यानंतरही लाखो रुपयांच्या लोभापायी काहीजण याची तस्करी आणि विक्री करतात.


इतर महत्त्वाच्या बातम्या: