'एखादा शेतकरी जरी आनंदात असल्याचे म्हणाला, तर त्याला 1 लाखाचं बक्षीस देईन!'
पंडित सावळे सांगतात की, ''वास्तविक विक्रमी उत्पादनामुळे बाजारपेठेत विक्रेते भरपूर आहेत, पण चलनतुटवड्यामुळे बाजारपेठेकडे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे या परिस्थितीत एखाद्या शेतकऱ्याने आनंदी असल्याची प्रतिक्रीया दिली, तर त्याला आपण एक लाखाचे बक्षीसही देऊ असे आव्हान दिले आहे.''
वास्तविक, कांद्याच्या बाजारपेठेत नेहमीच रोखीने व्यवहार होतात. मात्र, सध्या कांदा व्यापारी शेतकऱ्यांना चेकने पेमेंट करत आहेत. जिल्हा बँकांवरील निर्बंधामुळे शेतकरी बँक खात्यातून पैसे काढू शकत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. नाशिकमधील कांदा बाजारपेठेतील इतर शेतकऱ्यांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले आहे.
गेल्या वर्षी कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्याच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र या वर्षी नोटाबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले. पंडित सावळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, ''5 एकर शेतात सरासरी 80 क्विंटल कांद्याचे पीक येते. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले, तरी नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.''