Pushpa 2 The Rule Review: पुष्पाचा पहिला भाग जिथे संपला होता, तो पाहता पुष्पा 2 मध्ये आणखी काही तरी भव्य दिवय पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. अल्लू अर्जुन आणि फहाद फासिलमधील शत्रुत्व पुढे कोणते वळण घेते आणि त्यात कोण जिंकते हे पाहाण्याची खूप इच्छा होती. त्यामुळेच पुष्पा-2 ची आतुरतेने वाट पाहात होतो. पण पुष्पा-2 पाहिला आणि काही अंशी भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास यासाठी की ज्याची अपेक्षा होती त्यापैकी यात काहीही नाही. एका वाक्यात सांगायचे तर पुष्पा-2 हा काही उल्लेखनीय महान चित्रपट नाही, तर तो एक 80-90 च्या दशकातील हिंदी एंटरटेनर चित्रपटांसारखाच चित्रपट आहे, जो प्रेक्षकांचे फूल मनोरंजन करतो.
चंदनचोर पुष्पा यात सगळ्यात मोठा चंदनचोर झाला आहे. तो एक सिंडिकेट चालवतो. आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तो चंदनाची तस्करी करीत असतो. भैरोसिंह शेखावतचा चकमा देऊन तो चंदनाची तस्करी करीत असतो. पहिल्या भागातील तस्करीप्रमाणेच यातही एक असाच वेगळ्या पद्धतीने तस्करीचे दृश्य टाकले आहे. समंथाच्या आयटम साँगप्रमाणे श्रीलीलाचे आयटम साँग आहे, पण त्यात काही मजा नाही. पुष्पाची श्रीवल्ली गरोदर आहे तिला मुलगी व्हावी अशी पुष्पाची इच्छा आहे.
चित्रपटाची सुरुवात जोरदार आहे. त्यानंतर चित्रपट बऱ्यापैकी पकड घेतो. भैरोसिंहबरोबरचा त्याचा उंदीर-मांजराचा खेळ सुरु राहतो. त्यातच राजकारणाचाही प्रवेश होतो. हाणामारी होत राहते आणि अल्लू अर्जुन वेगळ्या पद्धतीने हाणामाऱ्या करतो ज्या पडद्यावर बघताना मजा येते. महाकालीच्या वेशातील अल्लू अर्जुनचे नृत्य आणि हाणामारी चांगली आहे. हे रूप निर्माता-दिग्दर्शक आणि अल्लू अर्जुनला आवडल्याने क्लायमॅक्सलाही अलू अर्जुनला तसेच रूप देण्यात आले आहे आणि त्याच रुपात तो हाणामारीही करतो.
चित्रपटाचा तिसरा भाग आणायचा असल्याने भैरोसिंह आणि पुष्पाचा खेळ यात अर्धवटच सोडला आहे. आणखी एका नव्या खलनायकाचा प्रवेश तिसऱ्या भागात होणार असल्याचे सूतोवाचही शेवटी करण्यात आले आहे.
अल्लू अर्जुनने पुष्पाची भूमिका जोरदारपणे साकारली आहे. पहिल्या भागापेक्षा यात तो जास्त भाव खाऊन गेला आहे. मूळ भूमिकेचा सूर त्याने यातही कायम ठेवल्याने तो पडद्यावर जे काही करतो ते प्रचंड आवडते. श्रेयस तळपदेच्या आवाजाने त्याच्या भूमिकेला चार चांद लावले आहेत. सगळ्यात कमाल आहे हिंदी संवाद लेखक राजेंद्र सप्रेची. अत्यंत क्रिस्पी आणि पिटातील प्रेक्षकांना आवडतील असे हिंदी संवाद आहेत त्यामुळे चित्रपटातील मजा आणखी वाढते. पुष्पाची क्रेज म्हणण्यापेक्षा अल्लू अर्जुनची क्रेझ कमालीची आहे. अमिताभच्या अँग्री यंग मॅनची आठवण अल्लू करून देतो. मल्टिप्लेक्समध्येही अल्लू अर्जुनच्या एंट्रीला आणि हाणामारीला टाळ्या वाजतात त्यावरून त्याची क्रेझ स्पष्टपणे दिसून येते.
रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची भूमिका साचेबद्धपणे साकारली आहे. तिला जास्त काही करण्याची संधीच नाही. पहिल्या भागात तिने टाकलेला प्रभाव दुसऱ्या भागातही कायम राहतो हेच तिचे वैशिष्ट्य.
फहाद फासीलने भैरोसिंह शेखावतच्या भूमिकेत जान ओतली आहे. त्याच्याकडून दिग्दर्शकाने खूप काही करून घेतले असावे पण ते तिसऱ्या भागात दिसेल असे वाटते. अन्य कलाकारांमध्ये जगपती बाबू, जगदीश भंडारी, राव रमेश यांनी त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चपखलपणे साकारली आहे. देवी श्रीप्रसाद यांच्या संगीतात पुष्पा-1 प्रमाणे दम नाही. पुष्पाचे टायटल साँग सोडल्यास अन्य गाण्यांमध्ये काहीही कमाल नाही.
दिग्दर्शक सुकुमारचे कौतुक करावे लागेल कारण त्याने प्रेक्षकांना काय आवडते याचा पुरेपूर विचार करून पुष्पा-2 ची मोट बांधली आहे. अॅक्शन, कॉमेडीचा पुरेपूर डोस प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. पण चित्रपटाची शेवटची 20-25 मिनिटं चित्रपट संपूर्णपणे कौटुंबीक होतो आणि प्रेक्षकांचा रसभंग होतो. शेवटच्या या भागाचे एडिटिंग करून तीन तासाचा चित्रपट अडीच तासात बसवला असता तर आणखी चांगले झाले असते.
पण एकूणच एकदा पाहावा असा हा पुष्पा-2 द रुल आहे.