Y Movie Review : अनेक सिनेमांमधून सामाजिक विषय जरी हाताळले जात असले तरी सिनेमा या माध्यमाचा मुख्य हेतू मनोरंजन हाच आहे. स्वत:चं प्रबोधन करुन घेण्यासाठी तिकिट काढून थिएटरमध्ये कोणी जात असेल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे कलाकृतीच्या माध्यमातून एखादा प्रश्न मांडायचा असेल, सामाजिक समस्येवर भाष्य करायचं असेल तर ते अशा पद्धतीने समोर ठेवलं गेलं पाहिजे की प्रेक्षकांचं मनोरंजन, प्रबोधन आणि डोळ्यात झणझणीत अंजन या तीनही गोष्टी एकाचवेळी साध्य होतील. आणि नेमकं हेच करण्यात ‘वाय’ हा सिनेमा कमालीचा यशस्वी झाला आहे.


‘वाय’ हा सिनेमा स्त्री भ्रूण हत्येबद्दल बोलतोच, त्यातलं भीषण वास्तव आपल्या समोर मांडतोच पण त्याचबरोबर तगडी कथा आणि त्याला दिलेल्या थरारक ट्रीटमेंटमुळे ‘वाय’ एक सिनेमा म्हणून थ्रिलिंग अनुभव देतो. 


आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना वरचढ कामगिरी करत असताना वंशाला दिवाच पाहिजे या मानसिकतेतून आपला बहुतांश समाज बाहेर आलेला नाही. यात शहरी-ग्रामीण, गरीब-श्रीमंत असे सगळेच आहेत. आणि त्यातूनच मग जन्माला येणाऱ्या मुलीचा गर्भातच गळा घोटला जातो. हे करणं बेकायदेशीर असलं तरी अनेक डॉक्टर्स हे सर्रास करताना दिसतात. अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्राने पाहिली आहेत. तोच धागा पकडून ‘वाय’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 


मुळात या सिनेमाचा दिग्दर्शक, निर्माते हे सगळेच वैद्यकीय व्यवसायातले आहेत. स्त्रीभ्रूण हत्येच्या अनेक केसेस त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. त्यातली व्यथा, वेदना आणि भीषणतेचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे ‘वाय’ पाहताना ती दाहकता आपल्याला जाणवते. सिनेमा संपला तरी आपण खुर्चीवर बसून राहतो कारण त्या फ्रेम्स डोळ्यासमोरुन जात नाही. 


उत्तम पटकथा हे या सिनेमाचं बलस्थान आहे. पूर्वार्धातले काही प्रसंग, काही सीन्स ज्या पद्धतीने फिरुन पुन्हा आपल्या समोर येतात ते पाहाताना  ‘सिटी ऑफ गॉड’ या ब्राझिलियन क्लासिकची आठवण होते. अर्थात संबंध केवळ ट्रीटमेंटपुरता. 


मुख्य भूमिकेत असलेल्या मुक्ता बर्वेनं नेहमीप्रमाणेच उत्तम काम केलं आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात तिच्या अभिनयाचा वाटा मोठा आहे. ओमकार गोवर्धन, रोहित कोकाटे, संदीप पाठक, प्राजक्ता माळी यांचंही कौतुक. या सगळ्यामध्ये भाव खाऊन जातात ते सुहास शिरसाट आणि नंदू माधव. निर्दयी, उलट्या काळजाचे, राक्षस, थंड डोक्याचे खुनी अशी वर्णनं आपण जेव्हा जेव्हा वाचू तेव्हा तेव्हा या दोघांचाच चेहरा आपल्या समोर येईल एवढं कडक काम त्यांनी केलं आहे.  


राकेश भिलारे याने या सिनेमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे. एक उत्तम गोष्ट त्यानं तेवढ्याच ताकदीनं पडद्यावर जिवंत केलीय. त्याच्या काही काही चित्रचौकटी आपल्याला अक्षरश: हादरवून टाकतात.


या सगळ्या जमेच्या बाजू असताना अगदी खटकणारी गोष्ट ही की हा सिनेमा एका गंभीर विषयावर भाष्य करणारा आहे हे अगदी पहिल्या फ्रेमपासून सांगितलं नसतं तरी चाललं असतं. सगळंच सोपं करुन न सांगता काही गोष्टी प्रेक्षकांनी समजून घेण्यासाठी सोडून द्यायला हव्या होत्या. अर्थात हे सगळं मी अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांपुरतं बोलतो आहे. 


शेवटी एवढंच सांगेन अजित वाडीकरच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारला गेलेला ‘वाय’ हा सिनेमा तुम्ही आवर्जून पाहायला हवा असा थ्रिलर आहे. या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.