Criminal Justice 3 Review : क्राईम ड्रामा सीरिज ‘क्रिमिनल जस्टिस’चा तिसरा सीझन (Criminal Justice 3) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सीरिजच्या मागील दोन सीझन्सनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. तिसऱ्या सीझनमध्ये आणखी उत्कंठावर्धक कथानक म्हणजे नेमकं काय असणारं, याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर काही काळापूर्वी हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् या सीझनमधून देखील अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi)यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. चला जाणून घेऊया काय आहे सीझन 3चे कथानक आणि का पाहावी ही सीरिज...
सीरिजच्या पहिल्याच फ्रेममध्ये कळतं की, ही केस एका लहान मुलीच्या हत्या प्रकरणाशी संबंधित आहे. ‘झारा’ ही एक बालकलाकार आहे. प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा कमावणारी एक बालकलाकार... घराच्या हॉलमध्ये मध्यभागी झाराचा मोठा फोटो लावलेला आहे. एकीकडे तिची आई तिच्या कामांची यादी तपासतेय, तर, दुसरीकडे तिचे वडील एका कंपनीकडे लेकीच्या कमाई पैसे मागत आहे. अर्थात या घराची संपूर्ण आर्थिक धुरा या मुलीवर आहे. या मुलीला एक सावत्र भाऊ देखील आहे, ज्याचं नाव मुकुल आहे. या चौकोनी कुटुंबाची कथा अचानक एक दिवशी वेगळं वळण घेते आणि सुरु होते न्यायाची लढाई!
झारा गायब होते अन्....
एक दिवशी झारा अचानक गायब होते. प्रचंड शोध घेतल्यानंतरही तिचा ठावठिकाणा लागत नाही. काही काळाने झाराचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागतो. या सगळ्या प्रकरणात संशयाची सुई येते ती झाराचा सावत्र भाऊ मुकुल याच्यावर. घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि मुकुल-झारा यांच्या नात्यातील तणाव मुकुलला दोषी ठरवण्यात यशस्वी ठरतो आणि त्याला अटक केली जाते.
प्रसिद्ध बालकलाकार असल्याने झाराच्या खुनाची बातमी मीडियामध्ये वाऱ्यासारखी पसरते. याचवेळी एन्ट्री होते पंकज त्रिपाठीची.. पेशाने वकील असलेल्या या पात्राचं नाव आहे माधव मिश्रा. आपला मुलगा निर्दोष असून, त्याला वाचवण्याचे काम आता केवळ माधव मिश्राच करू शकतात, असे मुकुलच्या आईला वाटते आणि ती माधवकडे जाते. माधव मिश्रा हे आव्हान स्वीकारतात. संपूर्ण जग जेव्हा मुकुलला दोषी ठरवून मोकळं झालंय, तेव्हा आता यातून माधव मिश्रा त्याची सुटका कशी करतात, याचा थरार पाहण्यासाठी ही सीरिज आवर्जून पाहावी. या सीरिजचे एपिसोड सध्या डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहेत. सीरिजचा शेवट जाणून घेण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत.
पंकज त्रिपाठींच्या अभिनयामुळे प्रेक्षक जागी खिळतो!
‘क्रिमिनल जस्टिस 3’चे सर्वात महत्त्वाचे पात्र म्हणजे माधव मिश्रा. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हे पात्र ज्या साधेपणाने आणि सहजतेने साकारले आहे, ते प्रेक्षकांच्या मनाला या सीरिजशी कनेक्ट करण्यात महत्त्वाचं ठरलं आहे. पंकज त्रिपाठी यांनी नेहमीप्रमाणे रसिकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय, माधव मिश्राच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या श्वेता बसू प्रसादनेही चांगले काम केले आहे. दुसरीकडे, पूरब कोहली आणि गौरव गेरा यांचा अभिनय देखील चांगला आहे. सावत्र भावाची आणि आरोपीची भूमिका साकारणाऱ्या आदित्य गुप्ताने देखील स्वतःला भूमिकेशी एकरूप केले आहे. झाराची भूमिका करणाऱ्या देशनानेही बालकलाकार असण्याचा ऑरा जपला आहे.
का बघाल सीरिज?
पहिल्या सीझनच्या तुलनेत कथा काहीशी कमजोर वाटते. मात्र, पंकज त्रिपाठींच्या अभिनयामुळे प्रेक्षक सीरिजच्या शेवटापर्यंत नक्की पोहोचतो. क्राईम ड्रामा आवडता असल्यास आणि पंकज त्रिपाठींच्या अभिनयाची जादू अनुभवायची असल्यास ‘क्रिमिनल सीझन 3’ ही सीरिज नक्की पाहावी!
संबंधित बातम्या