Vaibhav Mangale : विश्वविक्रमी बालनाट्य अर्थात ‘अलबत्या गलबत्या’ (Albatya Galbatya) हे चिमुकल्या प्रेक्षक वर्गाच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. या नाटकाने बालरंगभूमीला पुन्हा एकदा एक नवीन जीवनदान दिले होते. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी साकारलेल्या चिंचि चेटकिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र, आता वैभव मांगले यांनी या भूमिकेतून आणि या नाटकातून एक्झिट घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे.
‘ती मी नव्हेच’ असे म्हणत वैभव मंगले यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यासोबतच त्यांनी या नाटकातले काही फोटो देखील शेअर केले आहे. आता वैभव मांगले यांच्याऐवजी अभिनेता निलेश गोपनारायण ‘चिंचि चेटकिणी’ची भूमिका साकारणार आहे.
काय म्हणाले वैभव मांगले?
काही वेळापूर्वीच अभिनेते वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी म्हटले की, प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, ‘ती मी नाहीच’.
पाहा पोस्ट :
जुनी चिंचि-नवी चिंची ‘सेम टू सेम’
सध्या सोशल मीडियावर नवीन चिंचि चेटकिणीचे अर्थात अभिनेता निलेश गोपनारायण यांचे फोटो प्रचंड चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी साकारलेली लोकप्रिय चेटकीण आणि निलेश गोपनारायण साकारत असलेली चेटकीण ही अगदी ‘सेम टू सेम’ दिसत आहे. दोन्ही कलाकारांचे चेटकिणीच्या पात्रातील फोटो पाहता त्यातील फरक देखील ओळखू येत नाहीये. नुकतीच या नाटकाच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा झाली. नाटकाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर वैभव मांगले यांना प्रेक्षकांकडून विचारणा होऊ लागली की, आम्ही येतोय नाटकाला, आम्हाला भेटू शकाल का? चाहत्यांच्या या विचारणेनंतर, दुसऱ्या एका अभिनेत्याला वैभव मांगले समजून प्रेक्षकांचा भ्रमनिरास होऊ नये, म्हणून वैभव मांगले यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
निर्माते म्हणतायत...
अभिनेते वैभव मांगले यांनी या नाटकाचा निरोप घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, निर्माते राहुल भंडारे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात ‘एबीपी माझा’शी बोलताना ‘अलबत्या गलबत्या’चे (Albatya Galbatya) निर्माते राहुल भंडारे म्हणाले की, ‘या नाटकाने बालरंगभूमीला एक नवीन ऊर्जा मिळवून दिली आहे. आजवर या नाटकाचे विश्वविक्रमी प्रयोग झाले. मात्र, सध्या अभिनेते वैभव मांगले यांच्याकडे इतरही अनके प्रोजेक्ट आहेत. पण, हे नाटक चिमुकल्या प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे, त्यामुळे यात कोणताही खंड पडू नये, असे आम्हाला वाटले. केवळ, चिंचिची ही विश्वविक्रमी घौडदौड अशीच सुरु राहावी, यासाठी नव्या अभिनेत्याचा विचार करण्यात आला आहे.’
हेही वाचा :