Panchayat 3 Review : आजच्या घडीला वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. AI, व्हिजुअल इफेक्ट्स आले आहेत. थिएटर, लॅपटॉप आणि मोबाईलच्या स्क्रीनवर प्रेक्षक विचार करणार नाहीत अशा गोष्टी दाखवल्या जात आहेत. अशावेळी 'पंचायत' (Panchayat) सारखी वेबसीरिज येणं आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं हैराण करणारं आहे. प्राईम व्हिडीओवर बहुप्रतीक्षित 'पंचायत 3' ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल. 35-40 मिनिटांचे आठ एपिसोड पुन्हा एकदा प्रेक्षकांना फुलेरा गावात घेऊन जातील. आपल्याला ज्या गोष्टींचं अप्रूप वाटतं त्या गोष्टींचं गावऱ्यांना अप्रूप आहे.
'पंचायत'ची कथा काय? (Panchayat Story)
'पंचायत 3'ची कथा फुलेरा गावची आहे. सचिव जीचं ट्रांसफर थांबवण्यात आलं आहे. फुलेरा गावात ग्राम आवास योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या घरांवरुन वाद आहे. विधायक आणि गावकऱ्यांमध्ये वाद होतो. दरम्यान सचिव जी आणि रिंकीची लव्ह स्टोरी फुलते. प्रह्लाद आयुष्यात पुढे जातो. त्याच्याप्रमाणे आपणही पुढे जातो. त्यावेळी आपण आयुष्यात किती पुढे गेलो आहोत याचा मनात विचार येतो. किती पळतोय, थोडं थांबायला हवं. गावची ही गोष्ट अनुभवायला हवी.
'पंचायत' कशी आहे?
'पंचायत' सीरिज पाहताना नक्कीच तुम्हाला गावची आठवण येईल. तुमचं गाव नसेल तर मित्राच्या गावी जाण्याची इच्छा होईल. पहिल्या दोन सीझनप्रमाणे तिसरा सीझनदेखील तुम्हाला बांधून ठेवेल. सीरिजमधील अनेक गोष्टी तुम्हाला गुंतवून ठेवतील. आईच्या निधनानंतर मोफत घर मिळेल याचं मुलाला काहीही पडलेलं नाही. गावासाठी प्रह्लाद आपल्या बँक अकाऊंटमधू पाच लाख रुपये काढतो. या गोष्टींवरुन आजच्या काळातही माणूसकी जिवंत आहे असं वाटतं. शहरात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी माणूस फक्त पळतोय पण सुख, शांती, समाधान या गोष्टी गावातच आहेत हे दाखवणारी ही सीरिज आहे. एखाद्या कवितेप्रमाणे या सीरिजचं कथानक पुढे सरकतं. त्या गोष्टीप्रमाणे तुम्हीदेखील पुढे जाता. सीरिजमधील अनेक छोट्या गोष्टी तुम्हाला बरचं काही शिकवतील. सीरिज संपल्यानंतर आयुष्यात गावात राहणारी मंडळी जिंकली आहेत, आपण काय करतोय, असं तुम्हाला वाटेल.
कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक
'पंचायत 3'ची जान कथानक आणि कलाकार आहेत. यंदाही प्रत्येक अभिनेत्याने कमाल केली आहे. सचिवची भूमिका जितेंद्र कुमार उत्तम वठवली आहे. फुलेरा गावात पुन्हा आल्याने त्यांना आनंद होतो. पण अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रिंकीच्या प्रेमात पडतो आणि त्याला अभ्यासही करायचा आहे. त्याच्या प्रत्येक हावभावात वेगळेपण आहे. सरपंचाच्या भूमिकेत रघुबीर यादवने चोख भूमिका बजावली आहे. रघुबीरच्या अभिनयाचा तुम्ही अंदाज घेऊ शकत नाही. पुन्हा एकदा त्याने कमाल काम केलं आहे. नीना गुप्ताचं काम शानदार आहे. सोशल मीडियावर मॉर्डन अंदाजात दिसणारी नीना गुप्ता या सीरिजमध्ये मात्र साधीभोळी दाखवण्यात आली आहे. प्रह्लादच्या भूमिकेत फैसल मलिकने जबरदस्त काम केलं आहे. विकासच्या भूमिकेत चंदन रॉने पुन्हा एकदा कमाल काम केलं आहे. रिंकीच्या भूमिकेत सान्विका कमाल वाटते. तिचा सहज वावर प्रेक्षकांची मने जिंकतो. बनराकस म्हणजेच भूषणच्या भूमिकेत दुर्गेश कुमार जबरदस्त आहे. बिनोदच्या भूमिकेत अशोक पाठक पुन्हा कमाल करतो. क्रांती देवीच्या भूमिकेत सुनीता राजवरने शानदार काम केलं आहे.
'पंचायत 3' या सीरिजचं लेखन चंदन कुमारने केलं असून दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजचं कथानक आणि दिग्दर्शन दोन्ही उत्तम जमून आलं आहे. काहीही ताणलेलं नाही. त्यामुळे सीरिज कुठेही ओव्हर द टॉप वाटत नाही. साध्या गोष्टी साध्या पद्धतीनेच दाखवण्यात आल्या आहेत. कुठेही दिग्दर्शकाने आपली पकड सोडलेली नाही. एकंदरीतच ही सीरिज तुमचं मन जिंकून घेईल.